मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी रायगड पोलिसांनी अटक केली, मुंबईतील वरळी येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतलं, तिथून रायगड पोलिसांनी दुपारी १ च्या सुमारास अर्णब गोस्वामी यांना अलिबागच्या कोर्टात हजर केले. अर्णबला १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र रात्री उशीरापर्यंत अर्णब प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरु होती
अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला. तेव्हा न्यायधीशांनी अर्णबची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अर्णब गोस्वामी न्यायलयात हातवारे, इशारे करताना दिसल्यावर न्यायधीश संतापले, त्यांनी अर्णब गोस्वामी यांना तुम्ही नीट उभे राहा, हातवारे करू नका असं बजावलं, त्यानंतर अर्णब शांत बसून सुनावणी ऐकू लागले. अर्णबला मारहाण केल्याचा आरोप पोलिसांनी नाकारला. त्यानंतर रिमांड अर्जावर सुनावणीवेळी कोर्टाने ३ निरीक्षणे नोंदवली.
पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली, कोणताही सबळ पुरावा नसताना अर्णब गोस्वामी आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी का पाहिजे हे कोर्टाला सांगता आलं नाही, तर अन्वय नाईक,आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध याबद्दल रायगड पोलीस न्यायालयाला समजून सांगू शकले नाहीत, पुरावेही देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक अवैध असल्याचं सांगत न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावली. याबाबत बीबीसीनं वृत्त दिलं आहे. जवळपास ८-९ तास कोर्टात ही सुनावणी सुरु होती. न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सुनावणीनंतर अर्णब गोस्वामी यांच्याकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला परंतु त्यावर सुनावणी कधी होईल याबाबत कोर्टाने अद्याप स्पष्ट सांगितले नाही. मात्र अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांनी या प्रकरणात मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दुपारी ३ वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
भाजपचे नेते आक्रमक
अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री एस. जयशंकर, रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, स्मृती इराणी इत्यादींनीही कारवाईचा निषेध केला.
काँग्रेसचे प्रत्युत्तर
अर्णब यांच्या अटकेवरून भाजपचा आक्रोश एकतर्फी असल्याचे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले. अर्णब यांनी पत्रकारितेला बदनाम केले आणि भाजपने अशी एकतर्फी भूमिका घेतल्याने आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी दिली.
अटकेनंतर केली दीड तास चौकशी
अलिबाग येथील अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक केल्यानंतर पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी, ४ नोव्हेंबरला रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार अर्णब गोस्वामींना अटक केली. मुंबईतील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर, त्यांना चौकशीसाठी अलिबागला आणण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास पोलीस अलिबागमध्ये पोहोचले. पोलीस ठाण्यासमोर पोलीस गाडीतून उतरल्यानंतर अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारांकडे बघून विजयाची खूण दाखवली.
घटनाक्रम : अटक प्रकरण
- सकाळी ७ वाजता : मुंबई आणि रायगड पोलीस अर्णब यांच्या वरळी येथील घरी धडकले.
- सकाळी ८:१५ वाजता : अर्णब गोस्वामी मुंबई आणि रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले.
- सकाळी ११.३० : पोलीस बंदोबस्तामध्ये अर्णब यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
- दुपारी १२.१४ : अलिबाग पोलीस ठाण्यातच आरोग्य तपासणी करण्यात आली.
- दुपारी १ : अर्णब न्यायालयात हजर, मारहाण केल्याचा आरोप.
- सायंकाळी ५ : पुन्हा आरोग्य चाचणी करत न्यायालयात हजर करण्यात आले