मुंबई – १९८०-९० च्या दशकात शेअर बाजारचा बेताज बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षद मेहता हा अनेक हजार कोटींचा घोटाळा करेल असं बहुधा कोणाला वाटलं नसावं. हर्षद मेहता याचा ४ हजार कोटींचा घोटाळा १९९२ मध्ये उघडकीस आला होता. आता या घोटाळ्याशी संबंधित एक वेब सिरीज सोनी लिव्हवरही प्रसिद्ध झाली आहे. प्रेक्षक या वेबसिरीजमधील मुख्य अभिनेते प्रतिक गांधी यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. असो, आज आम्ही तुम्हाला या मालिकेबद्दल नाही तर खऱ्या आयुष्यात हर्षद मेहताच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाचे काय झालं याबद्दल सांगणार आहोत.
२००१ मध्ये पोलिस कोठडीत हर्षद मेहता याचा मृत्यू झाला होता, परंतु त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घ कायदेशीर लढा द्यावा लागला. २७ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर अखेर प्राप्तिकर न्यायाधिकरणाने दिवंगत हर्षद मेहता, त्यांची पत्नी ज्योती आणि भाऊ अश्विन यांच्याकडून फेब्रुवारी २०१९ मध्ये २ हजार १४ कोटींची टँक्स डिमांड नाकारली.वर्ष २०१९ मध्ये हर्षदच्या पत्नीनेही स्टॉक ब्रोकर किशोर जानी आणि फेडरल बँकेविरूद्ध खटला जिंकला. १९९२ मध्ये हर्षदकडून किशोरने ६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, त्याला कोर्टाने १८ टक्के व्याज देऊन परत करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
हर्षदचा भाऊ अश्विन मेहता यांनी ५० च्या दशकात कायद्याची पदवी मिळविली आणि आता ते मुंबई उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात प्रँक्टिस करतात. त्यांनी एकट्याने अनेक न्यायालयीन प्रकरणे लढविली आणि आपल्या भावाचं नाव वाचवण्यासाठी बँकांना सुमारे १७०० कोटी रुपये भरपाई दिली आहे. ते हर्षदचे वकील तसेच त्याच्या फर्ममधील स्टॉक ब्रोकर होते.
२००१ मध्ये हर्षद मेहताच्या मृत्यूनंतर त्याच्यावरील खटला संपला परंतु अश्विनने २०१८ पर्यंत कायदेशीर लढाई सुरूच ठेवली, जोपर्यंत एका विशेष कोर्टाने त्याला स्टेट बँक ऑफ इंडियाची फसवणूक केल्याच्या प्रकरणात निर्दोष मुक्त केले. हर्षदचा मुलगा अतूर मेहता याच्याविषयी विश्वसनीय माहिती नाही. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, हर्षदचा मुलगा अतूर मेहता यांनी २०१८ मध्ये जेव्हा बीएसई-सूचीबद्ध टेक्सटाईल कंपनी फेअर डील फिलामेंट्समध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी घेतली होती तेव्हा लोकांचे लक्ष वेधून घेतले.
हर्षद मेहताची कहाणी खूप रंजक आहे. त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत, ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला वेब सीरीज पाहावी लागेल अथवा त्याच्याबद्दल वाचावं लागेल, पण एक गोष्ट स्पष्ट आहे की हर्षद मेहता कायम लोकांसाठी उत्सुकतेचा विषयच राहिला आहे.