बई : आपल्या साथीदाराची क्रूर हत्या करणाऱ्या मनोज साने (५६) याची पोलिस कोठडी मिळावी यासाठी पोलिसांनी त्याची मनोवैज्ञानिक चाचणी करणार असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. यासाठी त्याची सोमवारी, १९ जून रोजी जे. जे. रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात सविस्तर वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
मीरा रोड येथे मनोज साने याने त्याची साथीदार सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. एवढे क्रौर्य मनोज साने याच्यात आले कुठून, त्याची मानसिक स्थिती त्यावेळी काय असेल, याचा अंदाज घेण्यासाठी मनोज सानेची मनोवैज्ञानिक चाचणी केली जाणार आहे. अशा पद्धतीच्या चाचणीत मानसोपचार तज्ज्ञ आणि मनोशास्त्रज्ञ दोन्ही मिळून आरोपीच्या मनोवैज्ञानिक तपासणीअंतर्गत चाचण्या करतात. त्यात संबंधिताचे व्यक्तिमत्त्व मूल्यांकन, बौद्धिक क्षमता, विचार करण्याची प्रक्रिया याची तपासणी तर केली जातेच, शिवाय त्याशिवाय त्या व्यक्तीला काही वेळेसाठी वॉर्डात दाखल करून देखरेखीखाली ठेवण्यात येते. तसेच त्याच्या मानसिक स्थितीचे सखोल निरीक्षण केले जाते. यासाठी तज्ज्ञ अनेकदा अशा व्यक्तीशी संवाद साधून सगळी माहिती विचारत असतात.
अशा प्रकारच्या चाचणीत संबंधित व्यक्तीचे बौद्धिक, मानसिक मूल्यांकन केले जाते. तसेच अशा प्रकरणात रिसर्च इंकब्लॉट टेस्ट केली जाते, याला मानसशास्त्रज्ञ प्रोजेक्टिव्ह टेस्ट म्हणतात. यात जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्पष्ट, अर्थहीन प्रतिमा (म्हणजे शाईचा डाग) दाखवली जाते तेव्हा त्याचे मन त्या प्रतिमेचा अर्थ लावण्यासाठी कठोर परिश्रम करते. ती व्यक्ती अस्पष्ट प्रतिमेला आपल्या मनातील संदर्भानुसार अर्थ देते. त्या व्यक्तीची आकलनशक्ती, व्यक्तिमत्त्वाचे मूल्यांकन आणि विशिष्ट मानसिक स्थितींचे निदान विशेषत: मनोविकृतीसाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते. - डॉ. शुभांगी पारकर, माजी विभागप्रमुख, केईएम रुग्णालय