नरेश डोंगरे / आशिष रॉयलोकमत न्यूज नेटवर्कपणजी (गोवा) : पणजीतील मांडवी नदीपात्रावर सुरू असलेल्या कॅसिनोतील जुगार, नृत्य अन् अन्य बाबींच्या संबंधाने सर्वत्र उलटसुलट चर्चा आहे. दुसरीकडे निसर्गाने भरभरून दिलेल्या छोट्याशा गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचाही व्यवहार होतो. त्याचे आणि कॅसिनोचे काही कनेक्शन असल्याचीही चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. त्याला अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी अमली पदार्थासोबतच हायप्रोफाईल वेश्याव्यवसायही कनेक्ट असल्याचे सांगितले जाते.
गोव्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी आणि व्यवसाय होतो. अमली पदार्थ प्रतिबंधक विभाग(एनडीपीएस, एनसीबी)कडून वेळोवेळी कारवाई करून त्याचा पर्दाफाशही केला जातो. २७ नोव्हेंबर २०२२ला एनसीबी गोव्याने गोव्यात दोन परदेशी व्यक्तींकडून १०७ एमडीएमएच्या गोळ्या, ४० ग्रॅम उच्च दर्जाचे मेफेड्रोन (एमडी) आणि ५५ ग्रॅम उच्च दर्जाचे चरस तसेच साडेचार लाखांची रोकड जप्त केली. अंबिका नामक रशियन महिला आणि तिचा ब्रिटिश साथीदार जे. ली. या दोघांना एनसीबीने अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे त्यांच्या साथीदारांच्या माध्यमातून ड्रग सिंडिकेट चालवित असल्याची माहिती यावेळी पुढे आली होती.
गोव्यातील पर्यटकांना हे अमली पदार्थ पुरविण्यात येत होते, असेही स्पष्ट झाले होते. या सिंडिकेटचा कॅसिनोशी संबंध आहे की नाही, ते अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचेही धागेदोरे जुळले असल्याचे समजते. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्यांकडून याबाबत अधिकृतपणे काही सांगितले बोलले जात नाही.
कॅसिनो संचालक काय म्हणतात ?दरम्यान, कॅसिनोचे समाजावर झालेले विपरीत परिणाम, विस्कळीत झालेले जनजीवन आणि जलजीवन तसेच कॅसिनोच्या माध्यमातून होणाऱ्या कथित गैरप्रकाराच्या संबंधाने विविध कॅसिनोच्या संचालकांची बाजू जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क केला. त्यावर ते म्हणाले...nश्रीनिवास नायक (मॅजेस्टिक प्राईड) : तुम्हाला जे छापायचे ते छापा. मला काही देणे-घेणे नाही.nगोपाळ कांडा (बिग डॅडी) : माझा एकच आहे. डेल्टीन ग्रुपचे तीन कॅसिनो आहेत. त्यामुळे आधी त्यांच्याशी बोला. नंतर माझ्याशी बोला.nआशिष कपाडिया (डेल्टीन ग्रुप) : मला माझ्या सहकाऱ्यांनी प्रकाशित झालेल्या सर्व कटिंग्स पाठविल्या आहेत. मी तुमच्या वरिष्ठांसोबत बोलणार आहे.