नवी मुंबई : व्हाट्सअप ग्रुपवरून झालेल्या ओळखीतून महिलेचा विश्वास संपादन करून बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. बापू पाटील असे त्याचे नाव असून तो सोलापूरचा राहणारा आहे. त्याने सदर महिलेची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. (Whats app Admin Rape on Women in CBD Belapur)
गतमहिन्यात सीबीडी पोलिसठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. उलवे परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर सीबीडी येथील हॉटेलमध्ये बलात्कार झाला होता. सोलापूर येथे राहणाऱ्या बापू पाटील याने वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. उलवेतील एका महिलेला देखील या ग्रुपची सदस्य बनवून, ग्रुपवर येणाऱ्या पोस्ट इतर सोशल मिडीयावर पसरवण्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान ग्रुपचा ऍडमिन बापू पाटील याने सदर महिलेसोबत जवळीक वाढवली होती. यातूनच त्याने काही महिन्यांपूर्वी तातडीचे काम असल्याचे सांगून तिच्याकडून ७५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र हे पैसे परत देण्यास तो टाळाटाळ करत होता. अखेर त्याने पैसे परत देण्याच्या बहाण्याने दोन महिन्यांपूर्वी या महिलेला सीबीडी येथील एका हॉटेलमध्ये बोलवले.
सदर हॉटेलमध्ये एक कॉन्फरन्स असल्याचे सांगून तिला त्याठिकाणी पैसे घेण्यासाठी यायला सांगितले. त्याठिकाणी खोलीमध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. शिवाय बापू पाटील याने तिच्या व्हाट्सअप हॅक करून तिचे इतरांसोबतचे संभाषण व खासगी फोटो चोरून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर तिने गतमहिन्यात सीबीडी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली असता बापू पाटील याला अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.