गुजरातमधील सुरतमध्ये महीधरपुरा येथील एका महिलेने तिची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात सासरची मंडळी आणि पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २७ वर्षीय पीडित महिलेला व्हॉट्सअॅप वेबवरुन पती गे असल्याचे लग्नाच्या पाच वर्षांनंतर कळालं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली.
गेल्या पाच वर्षांत पतीने तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवलेच नाही. अनेकदा पती काहीही कारण देत विषय टाळत होता. अखेर याबाबत धक्कादायक माहिती उघड झाली असून पत्नीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरतच्या गोपीपुरा भागात राहणाऱ्या एका महिलेचे २०१७ मध्ये नवापुरात राहणाऱ्या तरुणाशी लग्न झाले होते.
वधूच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने वडिलांनी शक्य त्या पद्धतीने मुलीचं लग्न लावून दिलं. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून हुंड्यासाठी सासरकडून त्रास देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर १५ हजार रुपयांची एफडी देखील करून दिली. लग्नानंतर तीन वर्षांनंतरही पतीने पत्नीसोबत शारिरीक संबंध ठेवले नाही. तो पत्नीसोबत खोलीत झोपण्यास नकार देत होता. पती आईसोबत झोपत होता. यावर पत्नीने विचारले असता आईच्या आजारपणाचे कारण सांगून तो विषयाला कलाटणी देत होता.
एकदा पतीचा मोबाईल पत्नीच्या हाती लागला. तिने व्हॉट्सअॅप वेबवरुन मोबाइल कनेक्ट केला. त्यानंतर तिने जे काही पाहिलं त्यामुळे तिला धक्का बसला. या व्हॉट्सअॅप चॅटवरुन आपला पती गे म्हणजे समलैंगिक असल्याचे कळताच तिची झोप उडाली. तसेच त्याचे इतर पुरुषांशी प्रेमसंबंध आहे हे तिला कळले आणि तिला खूप मोठा धक्का बसला. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. लग्नानंतर सासरच्यांकडून हुंड्यासाठी वारंवार छळ केला जात होता. सासरच्यांनी तिचा मानसिक छळ केला. महिलेच्या वडिलांनी लग्नानंतर १ लाखांची रक्कम एफडीमधून काढून दिले. दुसरीकडे मुल होत नसल्यामुळे सासरच्यांकडून तिला टोमणे ऐकावे लागत होते, अशा प्रकारे अनेक छळ पीडित महिलेवर होत होते. अखेर तिने पतीबरोबरच सासरच्या मंडळींविरोधातही तक्रार दाखल केली.