नवी दिल्ली - प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानं फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. मृत्यूच्या एक दिवस आधी सतीश कौशिक यांनी होळीची पार्टी केली होती. अचानक रात्री त्यांची तब्येत बिघडली. अभिनेत्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु हे प्रयत्न अयशस्वी ठरले. दिल्ली पोलीस आता कौशिक यांचा मृत्यू का आणि कशामुळे झाला याचा शोध घेत आहे.
सतीश कौशिक यांच्या होळी पार्टीत काय घडलं?दिल्ली पोलीस या गोष्टीचा तपास करत आहे की, सतीश कौशिक यांची तब्येत ज्या फार्महाऊसवर बिघडली तिथे ते कधी पोहचले होते आणि त्याठिकाणी काय झाले? इतकेच नाही तर ज्या लोकांनी सतीश कौशिक यांना हॉस्पिटलला नेले पोलीस त्यांचीही चौकशी करणार आहेत. सतीश कौशिक ७ मार्चला मुंबईतील शबाना आझमी यांच्या घरी होळी पार्टीत सहभागी झाले होते. तिथे निकटवर्तीयांसोबत होळी सेलिब्रेशन केले. त्याचे फोटोही ट्विट करण्यात आले.
त्यानंतर ८ मार्चला ते दिल्लीतील कुटुंबासह होळी साजरी करण्यास पोहचले. तिथे फार्महाऊसवर होळी खेळायला गेले होते. तिथे रात्री ११ वाजता कौशिक यांची तब्येत ढासळली. त्यानंतर तातडीने त्यांना फॉर्टिस रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी सतीश कौशिक यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु रात्री उशीरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलला नेईपर्यंत कुठलीही माहिती पोलिसांना दिली गेली नाही. हॉस्पिटल प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलीस सर्व अँगलने तपास करत आहे. सुरुवातीच्या तपासात काहीही संशयास्पद नसल्याचं पोलीस म्हणाले. दिल्लीच्या हरिनगर दीनदयाल रुग्णालयाच्या मेडिकल तज्ज्ञांकडून सतीश कौशिक यांच्यावर पोस्टमोर्टम करण्यात येणार असून डेथ टाईम, काय खाल्ले, प्यायले, हे सर्व रिपोर्टनंतर स्पष्ट होईल.
दरम्यान, सतीश कौशिक यांच्या निधनानं बॉलिवूड कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे. सतीशच्या मृत्यूची बातमी जवळचा मित्र अभिनेते अनुपम खेर यांनी दिली. सतीश कौशिक यांच्या आठवणीने अनेकांचे डोळे पाणावले आहेत. कौशिक यांच्यामागे त्यांची पत्नी शशि कौशिक आणि ११ वर्षीय मुलगी आहे. सतीश कौशिक हे अभिनेते, दिग्दर्शन, लेखक म्हणून काम करायचे. त्यांच्या अनेक विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.