पिंपरी : पिंपळे सौदागर येथील विराज जगताप या तरुणावर हल्ला करून खून करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत आक्षेपार्ह पोस्ट व मेसेज व्हायरल झाले. यातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (दि. १९) जगताप कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, महापालिकेचे विरोधी पक्षनेते नाना काटे आदी यावेळी उपस्थित होते.
विराज जगताप याच्या आजी असलेल्या माजी नगरसेविका सुभद्राबाई जगताप यांच्याशी गृहमंत्री देशमुख यांनी चर्चा केली. शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल. तसेच याप्रकरणासाठी पाहिजे तो वकील शासनातर्फे नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही देशमुख यांनी जगताप कुटुंबियांना दिली. त्यानंतर राज्य शासनातर्फे चार लाख २५ हजारांचा धनादेश जगताप कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या प्रकरणाला जातीय वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला होता. परंतु, विराजच्या कुटुंबियांनी हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दु:खाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांनी जगताप कुटुंबियांनी संयम दाखविला," असे सांगत महाराष्ट्राची हीच खरी ताकद आहे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सुभद्राबाईंनी समोर येऊन संपूर्ण गावाशी संवाद साधत माझा नातू गेला आहे तो काही परत येणार नाही. परंतु, आता या घटनेवर कोणत्याही प्रकारची तुम्ही वाईट पोस्ट करू नका, यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन वाद होईल, असे आवाहन त्यांनी केले.