अमरावती: हद्दीतील चोरीच्या वाढत्या घटनांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी नागपुरी गेट पोलिसांनी एका सराईताला टार्गेट केले. त्याच्या हालचाली टिपल्या. वरवर भणंग दिसत असला, तरी रोज रात्री तो महागडी दारू पितो, काहीही कामधंदा करत नसताना त्याचा रोजचा खर्च देखील नोकरदाराला लाजविणारा असल्याची माहिती मिळाली. संशयावरून ताब्यात घेतल्यानंतर त्याने टोलवाटोलव केली. मात्र, चार दिवसांच्या पाहुणचार आणि त्यादरम्यान दिलेली कबुली त्याला पोलीस कोठडीत घेऊन गेली. नागपुरी गेट पोलीस त्याच्याकडून दहा गुन्हयांची कबुली घेण्यात यशस्वी ठरले.
पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी त्याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली. जब्बार खान रऊफ खान (२४, अन्सारनगर, अमरावती) असे त्या सराईत चोराचे नाव आहे. आरोपीने अराफत कॉलनी, वाहेदनगर, यास्मिननगर, बंदेनवाब नगर, फरिदनगर, पॅरामाऊंट कॉलनी, सुफियाननगर, अफवाननगर, येथील दहा घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्या दहा घटनांमध्ये २७८ ग्रॅम सोने, ३.४७ लाख रुपये नगदी, मोबाईल असा एकुण ६.३६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. दरम्यान, १७ जानेवारी रोजी जब्बार खान याला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी पोलीस कोठडीदरम्यान त्याने ते सोने कुणाला विकले, याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी गेलेले २ लाख १ हजार रुपये किमतीचे ५५ ग्रॅम सोने, १७८ ग्रॅम चांदीचे दागिणे, रोख १५ हजार असा एकुण २ लाख २९ हजार ५० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील, एसीपी पुनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या टिम नागपुरी गेटने हे यशस्वी डिटेक्शन केले.
एसीपी पुनम पाटील यांचे नेतृत्वनागपुरी गेट हददीतील घरफोडीच्या घटना उघड करण्यासाठी एसीपी पुनम पाटील यांनी जातीने लक्ष घातले. त्यांनी तांत्रिक पुराव्यांचे अचूक विश्लेषण केले. नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी अनुभर पणाला लावला. खबरे तैनात केले. अन् खबर लागताच थोडेथोडके नव्हे तर तब्बल दहा गुन्हे उघडकीस आणले. नागपुरी गेटचे एपीआय संदीप हिवाळे, अंमलदार संतोष यादव, प्रमोद गुडधे, प्रवीण थोरवे, शैलेश लोखंडे, राहुल रोडे व मनीष यादव यांनी ही कारवाई केली. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी अन्सारनगर येथे न राहता आरोपी जब्बार खान हा वंदेनवाज कॉलनीेत भाड्याने राहत होता.