अंबरनाथ : सरकारनं बैलगाड्यांच्या शर्यतींवर बंदी घातलेली असतानाही अंबरनाथ तालुक्यात मात्र खुलेआमपणे बैलगाड्यांच्या शर्यती सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे गावात रविवारी शर्यती झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (bullock cart Race in ambernath, video goes viral)
उघडपणे बैलगाडी शर्यत होत असताना देखील पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेकदा नियम धाब्यावर बसवून बैलगाड्यांच्या शर्यती आयोजित केल्याचे प्रकार घडले होते. मात्र दरवेळी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. उसाटणे गावातला व्हिडीओ सोमवारी सकाळपासून चांगलाच व्हायरल झाला असून त्यानंतरही पोलिसांकडे मात्र याबाबत कुठलीच माहिती नव्हती. व्हिडीओ पाहून त्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती यानंतर पोलिसांनी दिली.
मात्र सरकारने या शर्यतींवर बंदी घातलेली असतानाही या शर्यती आयोजित होतातच कशा आणि कुणाच्या आशीर्वादानं? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ठाणे जिल्ह्यात लॉक डाउन असतानादेखील बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले जात आहे या शर्यतींना कोणी मज्जाव घालू नये यासाठी सकाळी या शर्यती भरविण्यात येत आहेत. या शर्यतींची कल्पना पोलिसांना असतानादेखील ते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.