हिंगोली : तालुक्यातील सवड येथे बँक योजनेची माहिती सांगण्यासाठी गेलेल्या एसबीएच बँकेच्या अधिकाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना २६ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत सदर इसमावर ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत बँकेतील कामकाज ठप्प ठेवले जाणार आहे.
सविस्तर माहिती अशी की हिंगोली तालुक्यातील सवड येथे एसबीएच बँक शाखेचे अधिकारी प्रवीण कटरे हे एका कर्ज योजने संदर्भात २६ नोव्हेंबर माहिती सांगण्यासाठी गेले होते. यावेळी महिलांना कर्ज वाटपाबाबत माहिती देत असताना यावेळी गावातील एक इसम त्या ठिकाणी आला. आणि त्याने बँक अधिकारी कटरे यांच्या डोक्यात अचानक कोयत्याने मारण्यास सुरूवात केली. याबाबत कटरे यांनी विरोध केला असता त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरामुळे मात्र गावात एकच खळबळ उडाली. यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी मध्यस्ती करून अधिकाऱ्याची त्या इसमाच्या तावडीतून सुटका केली.
सदर घटनेची माहिती मिळताच बँकेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सवड येथे धाव घेऊन अधिकाऱ्यास हिंगोली येथे आणले. एसबीएच बँकेचे अधिकारी प्रवीण ठाकरे व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी सदर घटनेचा निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले. तसेच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या इसमाविरूद्ध जोपर्यंत ठोस कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत बँकेतील कामकाज बंद ठेवण्यात येईल असे ठाकरे यांनी सांगितले.