कल्याण - कल्याण-डोंबिवली शहर कायम वादग्रस्त चर्चेत राहिली आहेत ती प्रामुख्याने लाचेच्या प्रकरणामुळे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो की कल्याण तहसील कार्यालय शिपाई - लिपिकापासून ते वरिष्ठ अधिका-यांपर्यंत सर्वांच्याच खाबूगिरीची प्रकरण अनेकदा समोर आली आहेत. आता पुन्हा एकदा कल्याण शहर अशाच एका प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. कारण सोमवारी कल्याणच्या तहसीलदारांनाच लाच घेताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने 1 लाख 20 हजार रुपयांची लाच घेताना तहसीलदार दीपक आकडे यांच्यासह शिपाई मनोहर हरड हे अलगदपणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.
तक्रारदार यांच्या बांधकाम कंपनीने कल्याण नजीक असलेल्या वरप येथे घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरिल सुनावनीचे निकालपत्र देण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी पडताळणी दरम्यान लोकसेवक तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत: करिता 1 लाख रुपये लाचेची मागणी करुन ती कार्यालयीन शिपाई लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड याचेकडे देण्यासाठी सांगितली. तसेच लोकसेवक बाबु उर्फ मनोहर हरड यांनी स्वत: करिता व स्टाफ करिता 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरुन सोमवारी ( 30 ऑगस्ट) रोजी सापळा कारवाई दरम्यान हरड याने आकडे यांच्याकरिता 1 लाख रूपये व स्वतःकरीता 20 हजार -रूपये असे एकूण 1लाख 20 हजार रूपयांची लाच स्वीकारल्यानंतर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग ठाणे यांनी पकडले.
दरम्यान काही दिवसांपूर्वी केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात सुद्धा लाचलुचपत विभागाने सापळा रचला होता मात्र हा सापळा यशस्वी न झाल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात रंगली आहे. या घटनेमुळे सरकारी कार्यालय , या कार्यालयांच्या परिसरात वावरणारे दलाल एकूणच या कार्यालयांभोवती शिपाई ते अधिका-यांपर्यंत फिरणारे अर्थचक्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. थोडक्यात काय तर साधा एक कागद पुढच्या टेबलवर सरकवायचा असेल तर अगदी 200 -500 रुपयांपासून ते लाखो रुपयांचे तोडपाणी केलं जातं. "लक्ष्मीदर्शन " घेऊन आपला खिसा गरम केल्याशिवाय सरकारी कार्यालयात कामं होत नाही ही आता नागरिकांची देखील मानसिकता झाली आहे. तर " चहा पेक्षा किटली गरम " असाच काहीसा रुबाब सरकारी कार्यालयात बहुतांश शिपायांकडे पाहील्यावर लक्षात येत कारण अशा ठिकाणी साहेबांपेक्षा शिपायांनाच जास्त डिमांड का दिला जातो?. हे आता नागरिकांना देखील चांगलंच समजलं आहे.