पुणे - मोबाईल चोरी प्रकरणात कारवाई न करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून येरवडा पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले. करीम मोहम्मद शरीफ शेख (वय ४७) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या आठवड्याभरात शहर पोलीस दलात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २ सापळा कारवाई करुन पोलिसांना पकडल्याने एकच चर्चेचा विषय झाला होता. त्यात मंगळवारी रात्री उशिरा येरवडा पोलीस ठाण्यात पुन्हा कारवाई झाल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
गेल्या आठवड्यात वानवडी पोलीस ठाणे व शिवाजीनगर मुख्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन सापळा कारवाई केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला होता. करीम शेख याच्याकडे मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास होता. त्याने एका २४ वर्षाच्या तरुणाला या प्रकरणात कारवाई करु नये, म्हणून ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याची पडताळणी केल्यावर शेख याने तडजोड करुन २ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानंतर मंगळवारी रात्री सापळा रचण्यात आला. या तरुणाकडून २ हजार रुपये घेताना शेख याला रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरस्ते, उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपाधीक्षक प्रतिभा शेंडगे, पोलिस निरीक्षक राजू चव्हाण, पोलीस हवालदार शेळके आणि पोलीस कर्मचारी अभिजीत कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. वानवडी पोलीस ठाण्यातील हवालदार निसार मेहमुद खान यांना आणि एका खासगी व्यक्तीला ५ हजार रुपयांची लाच घेताना २५ एप्रिल रोजी पकडण्यात आले होते. त्याच दिवशी शिवाजीनगर मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक मनोज हरी काळे यांना सहायक पोलीस निरीक्षकाकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.