अहमदनगर : एमआयडीसीतील पाइपलाइनच्या कामासाठी तब्बल एक कोटी रुपये लाच म्हणून स्वीकारल्याची राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते. ही रक्कम जरी सहायक अभियंता अमित गायकवाडने स्वीकारली असली तरी त्यात कोण-कोण वाटेकरी आहेत? महामंडळाच्या बांधकाम विभागात अनेक वरिष्ठ अधिकारी कार्यरत असतात. गायकवाडने वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारली का, त्याने उपअभियंता गणेश वाघ याचेच नाव का घेतले याबाबत वाघ हाती लागल्यानंतर उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
लाच कशासाठी?छत्रपती संभाजीनगर येथील ठेकेदाराने तक्रार केली होती. या ठेकेदाराला लोखंडी पाइपलाइन बदलणे, रस्त्यांची दुरुस्ती यासारखी कामे दिली होती. पाइपलाइन बदलण्याचे काम उपभियंता वाघ याच्या काळात झाले होते. म्हणून मागील तारखेचे बिल बनवून ते मंजूर करून देण्यासाठी गायकवाडने एक कोटीची मागणी केली हाेती. एवढी मोठी रक्कम सहायक अभियंत्यांच्या सांगण्यावरून ठेकेदार देऊ शकतो का, ठेकेदाराचे लाच देण्यापूर्वी आणखी कुणाशी बोलणे झाले होते का? हे एक कोटी एकटा वाघच घेणार होता की इतर कुणापर्यंत वाटा पोहोचता होणार होता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.