पुणे : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून पंच करण्यात आलेला फरार किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) याच्या मुसक्या पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने आवळल्या आहेत. आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचे सांगत परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेक तरुणांना गंडा घातला आहे. त्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये इंपोर्ट-एक्स्पोर्टचा बिझनेस असल्याचेही तो सांगतो. खंडणी उकळल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत.परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाला फसवणुकीच्या तीन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात तो फरार होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी त्याला लुकआऊट नोटीस बजावली होती.मुंबईतील क्रुझ पार्टीत अटकेतील आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला होता. गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कात्रजमधील मांगडेवाडीतील लॉजमधून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गुरुवारी अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे उपस्थित होते.किरण गोसावीला गुरुवारी सायंकाळी न्यायालयात हजर करण्यात आले. गोसावी याच्याविरुद्ध कापूरबावडी, अंधेरी, कळवा या पोलीस ठाण्यांत एकूण ४ गुन्हे दाखल आहेत. त्याला ४ एप्रिल २०१९ रोजी फरार घोषित केले होते. गोसावी हा सध्या वापरत असलेला मोबाइल सचिन सिद्धेश्वर सोनटक्के या नावाने घेतला असून बनावट कागदपत्रांचा वापर करून तो घेतल्याचा संशय आहे. चिन्मय देशमुख यांचे पैसे ज्या बँक खात्यात स्वीकारले, त्याचा शेरबानो कुरेशी हिने कधीही वापर केला नसून, गोसावी याने बनावट अकाउंट तयार करून फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बनावट कागदपत्रांचा वापर करणे व बँक खाते सुरू करण्याच्या फाॅर्मवर बनावट सही करणे या गुन्ह्यांसाठी ४६५, ४६८ अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे. फरार असल्याच्या काळात तो कोठे फिरला याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
तरुणाला तीन लाखांचा गंडा परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणाला तीन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी किरण गोसावी याच्याविरुद्ध पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी त्याची मैत्रीण शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी हिला अटक केली आहे. गोसावीचा शोध घेण्यासाठी तीन पथके मागावर होती. बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास किरण गोसावी कात्रज परिसरात असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मांगडेवाडीतील लॉजमध्ये छापा टाकून त्याला अटक केली.
गाडीवर पोलीस बाेर्ड असायचा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरण गोसावी यापूर्वी ठाण्यात भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. तो ज्या गाडीतून फिरायचा त्यावर पोलीस असे ठसठशीत लिहिलेला बोर्ड असायचा. त्याच्याबरोबर एक तरुणी आणि सुरक्षारक्षकही असायचा, असे पोलिसांनी सांगितले.
बनावट नावाने अनेक राज्यांत फिरलाफरार असतानाच्या काळात किरण गोसावी हा लखनौ, फत्तेपूर, कानपूर, हैदराबाद, सोलापूर, सातारा, विजयपूर, अमळनेर, चाळीसगाव, मुंबई, पनवेल, लोणावळा या ठिकाणी फिरल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. पुणे पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते. त्याचे लोकेशन आढळलेल्या ठिकाणी पोलिसांचे पथक जात होते. मात्र, तो गुंगारा देत होता. तेथे तो सचित पाटील या बनावट नावाने व बनावट ओळखपत्र तयार करून राहत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. किरण गोसावीने बनावट कागदपत्रांचा वापर करत सचिन सिद्द्धेश्वर सोनटक्के या नावाने मोबाईल घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याची चाैकशी सुरू आहे.