तिहार कारागृहात खडी फोडत असलेला सुकेश चंद्रशेखरचे नाव अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी बोलावल्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्वतःला राजकारण्यांचे नातेवाईक, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी असे सांगून बडया बडया श्रीमंतांकडून सुकेशने खोऱ्याने पैसे उकळलेत. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) सोमवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मनी लाँड्रिंगप्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी फर्नांडिसही चंद्रशेखरच्या फसवणुकीची बळी ठरली असल्याचं उघड झालं आहे आणि या प्रकरणात साक्षीदार म्हणून तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. गेल्या आठवड्यात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंद्रशेखरचा आलिशान बंगला, ८२.५ लाख रोख आणि डझनभर महागड्या आलिशान कार जप्त केल्या होत्या. चंद्रशेखरवर तिहार जेलमधूनच १९०-२०० कोटी रुपयांचे खंडणी गोळा केल्याचा आरोप आहे.
कोण आहेत सुकेश चंद्रशेखर?बंगळुरू, कर्नाटक येथून आलेला सुकेश चंद्रशेखर यांना हायप्रोफाईल जीवन जगण्याच्या उत्कटतेमुळे एक ठग बनला आहे. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच त्याने फसवणूक करण्यास सुरूवात केली. जेव्हा सुकेशला बंगळुरू पोलिसांनी पहिल्यांदा पकडले तेव्हा तो फक्त १७ वर्षांचा होता. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या मुलाचा मित्र बनून एका कुटुंबाची १.१४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण होते. बंगलोरमध्ये त्याची पाळेमुळे खोदायला सुरुवात केल्यानंतर तो पळून चेन्नईला गेला. चंद्रशेखरला बालाजी म्हणूनही ओळखले जाते. नोकरी देण्याच्या नावाखाली त्याने अनेक लोकांकडून पैसे उकळले. त्याने आपले राजकारणी नातेवाईक असल्याचे भासवून १०० पेक्षा जास्त लोकांची ७५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे.२००७ पासून, सुकेशने सतत त्याच्या ठावठिकाणांत बदल केला आहे. त्याला सुंदर घरे आणि आलिशान कार यांची आवड आहे आणि त्याच्याकडे असलेल्या या आलिशान कार आणि बंगला ईडीने जप्त केले आहेत. सुकेशने देशातील मोठ्या शहरांतील प्रसिद्ध व्यक्तींना त्याने गंडा घातला आहे.ज्या प्रकरणामुळे राष्ट्रीय पातळीवर मिळाली कुप्रसिद्धी निवडणूक आयोगाच्या लाच प्रकरणी चंद्रशेखरला एप्रिल २०१७ मध्ये अटक करण्यात आली होती. तो एका हॉटेलमध्ये बसून टीटीवी दिनाकरन ग्रुपसोबत डील करण्याचा प्रयत्नात होता. निवडणूक आयोगाशी संपर्क असल्याचा दावा करून सुकेश ५० कोटी रुपयांच्या करारावर बोलणी करण्याचा प्रयत्न करत होता. चंद्रशेखर यांनी दावा केला की, शशिकला ग्रुपसाठी AIADMK चे दोन पानांचे चिन्ह मिळवण्यासाठी ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देणार होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या हॉटेलमधील खोलीतून १.३ कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती.मोडस ऑपरेंडी काय होती?नोकऱ्या मिळवून देतो सांगून फसवणूक करण्याचे चंद्रशेखरने सर्वात जास्त गुन्हे केले आहेत. एका राजकारणाचे नातेवाईक असल्याचे भासवून त्याने १०० पेक्षा जास्त लोकांना ७५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे एका अहवालात म्हटले आहे. काही ताकदवान व्यक्तींच्या नावांशी संबंधित असल्याचे भासवून तो टार्गेट असलेल्या व्यक्तींना विश्वासात घेत असे. काही वेळा कर्नाटकचे माजी मंत्री करुणाकर रेड्डी यांचे सहाय्यक असल्याचे भासवून आणि कधीकधी बीएस येडियुरप्पा यांचे सचिव असल्याचे भासवून सुकेशने लोकांची फसवणूक केल्याची प्रकरणे आहेत.
200 कोटींची फसवणूक झाल्याचे प्रकरण काय आहे?
सरकारी कारवाईच्या भीतीने सुकेशने एका व्यापारी कुटुंबाला कारागृहातून ५० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्याने भीतीपोटी पैसे दिले. जेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात तक्रार करण्यात आली. जेव्हा हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) गेले तेव्हा प्रकरण मोठं होऊन गाजावाजा झाला. आता अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आजपर्यंत कारागृहाच्या आतून अशी खंडणी गोळा केली गेली नव्हती. अगदी दिल्लीत खंडणी मागणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराची ही नोंद आहे.
२०१३ मध्ये, पोलिसांनी चंद्रशेखर आणि त्याची कथित मैत्रीण लीना मारिया पॉल यांना चेन्नईतील कॅनरा बँकेत फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. दोघांनाही नंतर जामीन मिळाला. मॉडेल असलेल्या चित्रपट अभिनेत्री लीनाचा सुकेसशी दीर्घकाळ संबंध आहे. २०१७ मध्ये, जेव्हा तिच्या ब्युटी पार्लरमध्ये गोळीबार झाला, तेव्हा ती रवी पुजारा टोळीच्या रडारवर आली. अंमलबजावणी संचालनालयाने लीनाची प्रदीर्घ चौकशी केली आहे.
काय जप्त केले आहे?
ईडीने चेन्नईहून सुकेशचा एक आलिशान बंगला जप्त केला आहे. सी-फेन्सिंग बंगले एका प्रकारच्या आधुनिक सुविधा आणि कर्मचाऱ्यांनी सुसज्ज आहेत. इटालियन संगमरवरी मजला, महागडे फर्निचर ... सर्वकाही महागड्या साधनसामुग्रीने सज्ज आहे. १६ हाय-एंड लग्जरी कार्स, ज्यात रॉल्स रायस गोस्ट, बेंटले बेंटाग्या, फरारी 458 इटालिया, लैबॉर्गिनी उरुस, एस्कलेड, मर्सिडिीज एएमजी 63 यांचा समावेश आहे.