बंगळुरूमध्ये एका इमारतीच्या प्लॅटमध्ये महालक्ष्मी नावाच्या महिलेची हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे महालक्ष्मीच्या मृतदेहाचे ४० तुकडे करण्यात आले. हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याचं समजल्यावर शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिची आई घरी पोहोचली. घरातील फ्रिज उघडल्यावर सर्वांना धक्काच बसला.
महालक्ष्मी विवाहित होती, पण पतीपासून वेगळी राहत होती. पतीने अशरफ नावाच्या व्यक्तीसोबत पत्नीचं अफेअर असल्याचा आणि त्यानेच तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला होता. पण नंतर पोलिसांनी महालक्ष्मीच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी हा कोणीतरी बाहेरची व्यक्ती असल्याचं समजलं.
मुक्ती रंजन असं आरोपीचं नाव असून तो ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील धुसुरी या गावचा रहिवासी होता. त्यानेच महालक्ष्मीची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी मुक्ती रंजन कामाच्या शोधात बंगळुरूला आला आणि इथल्या एका मॉलमध्ये कपड्याच्या दुकानात काम करू लागला.
एक वर्षापूर्वी २०२३ मध्ये मुक्ती रंजन आणि महालक्ष्मी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये भेटले, ओळख झाली आणि त्यानंतर ते एकमेकांशी बोलू लागले. कौटुंबिक वादामुळे पतीपासून दूर झालेल्या महालक्ष्मीने त्याच मॉलमधील कॉस्च्युम आउटलेटमध्ये टीम लीडर म्हणून काम केलं. मुक्ती रंजन याच्याशी तिचा संवाद वाढत गेला आणि दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली.
मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. ते एक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. महालक्ष्मी मला आवडायची असं मुक्ती रंजनने आत्महत्येआधी सांगितलं आहे. तसेच ती आपली फसवणूक करत असल्याने रागाच्या भरात तिची हत्या करून तुकडे केल्याचं देखील त्याने कबूल केलं. त्याने आपल्या आईसोर महालक्ष्मीची हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर त्याने आत्महत्या केली आहे.
"माझं महालक्ष्मीवर प्रेम होतं, पण ती मला..."; मुक्ती रंजनने आईसमोर दिली हत्येची कबुली
पोलिसांना सापडलेल्या मुक्ती रंजनच्या सुसाईड नोटमध्ये त्याने बहुतांश ठिकाणी इंग्रजी तर काही ठिकाणी ओडिया भाषेचा वापर केला आहे. महालक्ष्मीच्या हत्येची कबुली देताना मुक्ती रंजनने लिहिलं की, "मला ती आवडायची, माझं तिच्यावर प्रेम होतं, पण तिची माझ्यासोबतची वागणूक चांगली नव्हती. ती मला किडनॅपिंगच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत असे. मी खूप पैसेही खर्च केले."