लोकमत न्यूज नेटवर्क : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान शनिवारी तब्बल २७ दिवसांनी आर्थर रोड तुरुंगाबाहेर आला. ड्रग्ज पार्टीत सहभागाच्या आरोपावरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) त्याला अटक केली होती. हायकोर्टाने गुरुवारी त्याला जामीन मंजूर केला. तरीही आर्यनला आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागली. जामिनासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्याने आर्यनचा जेलमधील मुक्काम वाढला. जाणून घेऊया कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष तुरुंगाबाहेर पडण्यासाठी आरोपीला कोणत्या बाबींची पूर्तता करावी लागते.
जेलमधून निघताना पूर्ण करावी लागणारी प्रक्रिया
- तुरुंग प्रशासनाला जामिनाचा आदेश पोहचताच लाऊड स्पीकरवर कैद्याचे नाव पुकारले जाते.
- तुरुंगातील एक कर्मचारी जामीनावर सुटणाऱ्या कैद्यांच्या नावांची यादी घेऊन प्रत्येक बॅरेकमध्ये जातो. यादीत त्यांचे नाव व फोटो असतात.
- नंतर अर्ध्या तासात सर्वांना तुरुंग अधीक्षकांच्या ऑफिसजवळ असलेल्या मोठ्या हॉलमध्ये आणणतात.
- इथे पीएसआय दर्जाचा अधिकारी यादीनूसार कैद्यांची पडताळणी करून घेतो. कैद्यांना त्यांची नावे विचारली जातात.
- पडताळणीनंतर सगळ्यांना अशा हॉलमध्ये घेऊन जातात जिथे ५ काऊंटर असतात.
- इथे कैद्याला बोलावून त्याच्या जामिनाचे पेपर तपासले जातात. यावेळी कैद्याला जमिनीवर बसावे लागते.
- एका काऊंटरवर कैद्याच्या बोटांचे ठसे घेतात, दुसऱ्यावर डोळे स्कॅन केले जातात. तिसऱ्या काऊंटरवर त्याचा फोटो घेतला जातो.
- चौथ्या काऊंटरवर कैद्याची व्यक्तिगत माहिती ताडून पाहिली जाते. त्याचे रेकॉर्ड तपासले जाते.
- पाचव्या काऊंटरवर समुपदेशक असतात. गरज भासल्यास कैद्याला त्यांच्याशी बोलता येते.
- ही औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कैद्यांना पुन्हा तुरुंग अधीक्षकांसमोर एका रेषेत उभे केले जाते. अधीक्षक कैद्यांशी बातचित करतात.
- यानंतर सुटकेच्या आदेशावर सर्व कैद्यांच्या सह्या घेतल्या जातात. हा आदेश नंतर तुरुंगाच्या लिपिकाकडे दिला जातो.
- तुरुंगाचे लिपिक कोर्टाच्या सुटकेच्या आदेशाची नोंद करून त्याला मंजुरी देतात. लिपिकांनी सुटकेच्या आदेशाला मंजुरी दिल्यानंतर तुरंग अधीक्षक पून्हा त्यावर सत्यप्रत असल्याची नोंद करतात.
- तुरुंगाबाहेर पडण्याआधी कैद्याला त्याचे सामान परत दिले जाते. तुरुंगाच्या वाचनालयातून कैद्याने घेतलेली पुस्तके परत घेतली जातात. वाचनालयातील ना-हरकत रजिस्टरमध्ये कैद्याची सही घेतली जाते.
- तुरुंगाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या रजिस्टरमध्ये जामिनावर सुटणाऱ्या कैद्याची सही घेतली जाते.
- ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुरुंगाच्या लहान गेटमधून बाहेर सोडले जाते.