पुणे / किरण शिंदे: पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत तीन दिवसांपूर्वी पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करताना दोन तृतीयपंथीयांना पकडण्यात आले होते. हे दोघेही काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सुया आणि हळदीकुंकू हे साहित्य घेऊन पेटत्या चितेसमोर बसले होते. या दोघांनीही अघोरी पूजा करण्यास सुरुवात केली होती. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या नजरेस हे दृश्य पडल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मी निबाजी शिंदे (वय 31) आणि मनोज अशोक धुमाळ (वय 22) या दोन यांना अटक केली होती. अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत अघोरी पूजा करण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
आरोपी तृतीयपंथी मनोज धुमाळ याच्या आईला कॅन्सर आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या आईला या कॅन्सरचा त्रास होत होता. आईला होणारा त्रास पहावत नसल्याने मनोज धुमाळ याने अशा प्रकारे अघोरी पूजा करण्याचा निर्णय घेतला होता. पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केल्याने कॅन्सर बरा होऊन तो दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातो असा त्याचा समज होता. यासाठीच त्याने ही अघोरी पूजा करण्याचा घाट घातला होता. दुसरा तृतीयपंथी लक्ष्मी शिंदे याला हा प्रकार सांगितल्यानंतर तो या कामी मदत करण्यासाठी तयार झाला. पूजा करण्यासाठी दोघेही गुरुवारी मध्यरात्री वैकुंठ स्मशानभूमीत आले. अघोरी पूजा करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन ते पेटत्या चितेसमोर बसले होते. त्यांनी पूजा करण्यास सुरुवातही केली होती. मात्र त्यापूर्वीच स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला.
या कर्मचाऱ्याने तत्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत या दोघांनाही रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्याजवळ जळालेल्या अवस्थेत काही व्यक्तींचे फोटो आढळून आले. या दोघाविरोधात नरबळी व इतर अमानुष अघोरी दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळ सापडलेल्या फोटोतील व्यक्ती कोण आहेत, ते फोटो त्यांनी कशासाठी आणले होते त्याचा तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत.