जळगाव : तुझी आई आमच्याविरूद्ध तक्रार का देते म्हणत एका दाम्पत्याने तबस्सूम आरा इकबाल खान (२१, रा.गौतमनगर) या तरूणीला चापटा-बुक्क्यांनी मारहाण करून चावा घेतला. त्यानंतर दोघांनी तरूणीजवळील पैसे व चांदीची अंगठी ठेवलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेतल्याचा प्रकार मंगळवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गौतम नगर येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
तबस्सूम खान ही तरूणी आई व भावासोबत वास्तव्यास आहे. एका हॉस्पिटलमध्ये ती कामाला आहे. मंगळवारी रात्री काम आटोपून घरी जात असताना तिला गौतम नगरमध्ये घराजवळील एका दाम्पत्याने रस्त्यात अडवून तुझी आई आमच्याविरूद्ध तक्रार का देत असते असे म्हणाले. तबस्सूम ही त्यांची समजूत घालित असताना दोघांनी तिला शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तर महिलेने तबस्सूम हिच्या हाताला चावा घेतला.
हा प्रकार तिच्या भाऊ अमजद याला दिसल्यानंतर त्याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही दाम्पत्याने मारहाण केली. त्यानंतर दोघांनी तबस्सूम हिच्या हातील २ हजार ७०० रूपये व ६०० रूपये किंमतीची चांदीची अंगठी ठेवलेली बॅग बळजबरीने हिसकावून नेली. त्यानंतर तरूणीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.