अनेकदा जर कुणी अनोळखी व्यक्ती भेटले, ट्रेनचं उदाहरण घेतलं तर तिथे अनोळखी एकमेकांना भेटतात. सुरुवातीच्या ओळखीत नाव, नोकरी आणि शहर याची विचारणा होते. काही वेळा लग्न झालंय की नाही असा प्रश्नही ऐकायला मिळतो. झालं असेल तर ठीक नसेल झालं तर लग्न का झालं नाही असंही विचारलं जाते. मात्र लग्नाच्या याच प्रश्नामुळे कुणी इतका दुखी आणि नाराज असू शकतो ज्यामुळे तो एखाद्याची हत्या करेल अशी कल्पनाही कुणी करणार नाही.
इंडोनेशियात घडलेल्या अशाच एका प्रकारानं सर्वच हैराण झाले आहे. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय बनला आहे. स्थानिक वृत्तानुसार, इंडोनेशियातील साऊथ तपानुली प्रांतात २९ जुलैच्या रात्री धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ४५ वर्षीय पारलिंदुंगन सिरगारनं त्याच्या शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय असगिम इरियंटोची निर्घृण हत्या केली आहे. या हत्येमागचं कारण इतकं क्षुल्लक होतं जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. एक साधा प्रश्न, तुमचं लग्न का नाही झालं?
२९ जुलैच्या रात्री ८ वाजता पारलिंदुंगन सिरगार असगिम इरियंटो यांच्या घरी हातात एक लाकडाचा तुकडा घेऊन पोहचला. त्याठिकाणी काहीही न बोलता त्याने असगिमवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे असगिम पळत पळत रस्त्यावर आल्या परंतु आरोपीने त्यांचा पाठलाग करत डोक्यावर वार केले. या हल्ल्यात असगिम यांचा जीव गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. तिथे आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने केलेला दावा ऐकून पोलीस अधिकारी चक्रावले.
चौकशीत आरोपी पारलिंदुंगनने म्हटलं की, असगिम वारंवार माझ्या लग्नाबाबत प्रश्न विचारत असल्यानं मी नाराज होतो. लग्नावरून मस्करी करणं पसंत नव्हते त्यामुळे असगिमला मारण्याचं ठरवलं असं त्याने पोलिसांना सांगितले. असगिमची क्रूरपणे हत्या करण्यामागे कारण होतं ते म्हणजे असगिम सातत्याने पारलिंदुंगनला मस्करीनं तुझं अजून लग्न का झालं नाही असा सवाल विचारत होता. त्याचाच राग डोक्यात ठेवत आरोपीने असगिमवर हल्ला केला.
दरम्यान, या घटनेमुळे इंडोनेशियात खळबळ माजली आहे. आपण केलेल्या मस्करीचा आणि लग्नाबाबत विचारलेल्या सवालामुळे कुणी इतक्या क्रूरपणे हत्या करू शकते का असा सवाल लोकांना पडला आहे. एखाद्याचं बोलणं कधी मनाला इतकं लागतं, ज्यामुळे समोरच्याचा काटा काढायचा गंभीर विचार येऊ शकतो असा विचार लोकांना करायला या घटनेनं भाग पाडलं आहे. सोशल मीडियावर या मुद्द्यावर अनेकजण आपापली भूमिका मांडत आहेत.