नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखऱ यांची हत्या केल्याप्रकऱणी त्याची पत्नी अपुर्वा तिवारी हिला अटक करण्यात आली आहे. तिने पतीची हत्या केली असल्याचा उलगडा झाला आहे. रोहितच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचे संबंध ताणले होते. तसेच रोहितला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दारू पिताना अपूर्वाने पहिले होते. त्यानंतर रोहित आणि अपूर्व यांच्यात खटके उडत होते. अपूर्वाने त्यामुळेच रोहितच्या हत्येचा कट रचून गळा दाबून खून केला असे तपासात समोर आले आहे. दिल्ली पोलिसचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव रंजन यांनी अपूर्वाने ही हत्या केली असल्याचे तिने कबूल केले असून यात अजून कोणाचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेले नाही असं म्हटले आहे.
१६ एप्रिल रोजी रोहित शेखर याचा मृतदेह संशयास्पदरित्या मिळाला होता. त्याचा गळा दाबून हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. यात रोहित शेखरच्या आईने अपुर्वा आणि रोहितचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संशयाची सूई त्याच्या पत्नीभोवती फिरत होती. पोलिसांनी अपुर्वाची शनिवारपासून चौकशी सुरु केली होती. त्यानंतर तिने खून केल्याची कबूली दिली. लग्नापासूनच दोघांचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे तिने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, त्या दिवशी रोहितची आई उज्ज्वला साकेत भागातील मॅक्स रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळीच त्यांना घरातील नोकर आणि दुसरा मुलगा सिध्दार्थने फोन करून रोहितच्या नाकातून रक्त येत असून तो बेशुद्ध पडला असल्याचे सांगितले होते.
एन. डी. तिवारींच्या सुनेला अटक; रोहित तिवारीची हत्याच