अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणात सध्या पोलिसांसह प्रत्येकाला एकच प्रश्न सतावत आहे. तो म्हणजे पत्रकार बाळ बोठेने त्यांची हत्या का केली? बोठेच्या अटकेनंतरच या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. बोठे हा गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून याच हत्याकांडाची चर्चा आहे. हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग, नाजूक प्रकरण अशा एक ना अनेक विषयांची चर्चा या हत्याकांडाच्या निमित्ताने सुरू झाल्या आहेत. मध्यंतरी बोठे याने ‘हनीट्रॅप’ विषयावर एक वृत्तमालिका प्रकाशित केली होती. यामध्ये त्याने नगरमधील नामांकित व्यक्तींचा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता, तर काहींवर आरोपही केले होते. मात्र काहीच बाहेर आले नाही. त्यामुळे ही वृत्तमालिका का प्रकाशित केली होती, त्याचीही सध्या जिल्ह्यात चर्चा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे बोठेकडून मिळतील. राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील महिलेने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन बाेठेच्या विरोधात आरोप केले होते. त्यानंतर, काही दिवसांतच त्याच महिलेने पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आरोप मागे घेतले होते. त्यावेळी ही महिलाही बोठे याच्या दबावाखाली होती का? अशीही चर्चा होत आहे. तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढदरम्यान, जरे यांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले सागर उत्तम भिंगारदिवे, आदित्य सुधाकर चोळके व ऋषिकेश उर्फ टप्या वसंत पवार यांच्या पोलीस कोठडीत ११ डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. बोठेची अभ्यास मंडळावरील नियुक्ती रद्द होणाररेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळावरील नियुक्ती रद्द करण्याबाबत कुलगुरूंनी माहिती घेतली असून, मंडळाच्या अध्यक्षांनी गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती कुलगुरूंना दिली आहे. दोन वर्षांपूर्वी बोठे याची पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाली होती.
रेखा जरे यांची हत्या का केली? चर्चेला उधाण; हनीट्रॅप, ब्लॅकमेलिंग की आणखी काही?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 6:02 AM