उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याआधी तरुणाने ६ मिनिटे ५० सेकंदांचा व्हिडीओ बनवला आणि त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगितल्या, त्यानंतर त्याने आत्महत्या केली. कुटुंबाच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तरुणाची पत्नी आणि सासूसह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी व्हिडिओची दखल घेतली आहे आणि कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. सुरेंद्र सिंहने सहा मिनिटांचा व्हिडीओ बनवला ज्यामध्ये त्याने त्याची पत्नी, सासू आणि मेहुण्यावर छळाचा आरोप केला. सुरेंद्रने हा व्हिडीओ त्याच्या नातेवाईकांना पाठवला होता. सुरेंद्र इज्जतनगर पोलीस स्टेशन परिसरातील सैनिक कॉलनीत राहत होता. २५ जानेवारी रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुरेंद्रने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, माझ्या आयुष्यातून वेळ निघून जात आहे. मी एकटाच राहिलो आहे. माझ्यासोबत कोणी नाही. २०२० मध्ये माझं लग्न झालं, तेव्हा मला वाटलं की आता आयुष्य चांगलं होईल. मला माझ्या पत्नीला प्रेमाने जपायचं होतं, पण लग्नाआधीच तिचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. तिची आई म्हणायची की माझी मुलगी १५ दिवस तिच्या सासरच्या घरी आणि १५ दिवस तिच्या आईवडिलांच्या घरी राहील. शेवटी तेच घडले. माझ्या पत्नीने तिच्या बॉयफ्रेंडला हाताशी धरून माझ्यावर केस केली. माझं जगणं कठीण झालं. तिच्या बॉयफ्रेंडने मला मारहाण केली आणि धमकी दिली.
सुरेंद्रने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की,लग्नानंतर मला आनंदी राहायचं होतं. ती माझी चूक होती का? मुलगा असणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे, कारण कोणीही तुमचं ऐकणार नाही. ना कायदा ना पोलीस. मला जगायचं नाही. माझ्यात मरण्याचीही हिंमत नाही... पण मी काय करू शकतो, परिस्थिती अशी येते की माणूस चुकीचं पाऊल उचलतो. मला आई आणि बाबा खूप आवडतात. मी सरकारला विनंती करतो की कोणीही माझ्या पालकांना त्रास देऊ नये. माझ्या मृतदेहाचं शवविच्छेदन करू नये.