मेरठमध्ये मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांनी सौरभची हत्या केली आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये पतीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्याचं नशीब चांगलं असल्याने तो वाचला. झाशी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील चंद्रबनी नाका येथे अनिल पाल यांना एका कारने धडक दिली. यामध्ये अनिल जखमी झाला. त्याने एसपी ऑफिस गाठलं आणि त्याची पत्नी रजनी आणि तिचा बॉयफ्रेंड मंगल सिंहवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
अनिलने सांगितलं की, २० मार्च रोजी त्याने पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कारने याला धडक दिली आणि फरफटत नेलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे ज्यामध्ये कार त्याला धडक देऊन पळून जाताना दिसत आहे. ८ वर्षांपूर्वी त्याचं लग्न ग्वाल्हेरच्या टेकनपूर येथील रजनीशी झालं होतं. लग्न झाल्यापासून रजनी त्याला मारहाण करण्याची आणि खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होती. रजनीचं १२ वर्षांपासून अफेअर होतं.
अनिलने आरोप केला की, रजनी कोणत्या ना कोणत्या कारणाने टेकनापूर येथील तिच्या माहेरी जात असे. एकदा त्याने पत्नीचा पाठलाग केला तेव्हा त्याला कळलं की ती बालपणीचा मित्र मंगलला भेटायला येते. २० मार्च रोजी रजनी तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली आणि जेव्हा अनिल संध्याकाळी ५.३० वाजता तिथे पोहोचला तेव्हा त्याने पत्नीला मंगलच्या गाडीतून खाली उतरताना पाहिलं. जेव्हा त्याने थांबण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारने त्याला जोरदार धडक दिली आणि फरफटत नेलं.
दुसऱ्या दिवशी (२१ मार्च) रजनी घरातून २ लाख रुपये आणि सोन्याचा हार घेऊन गेली आणि कोणालाही न सांगता तिचा प्रियकर मंगलसोबत निघून गेली. ५ दिवसांनी रजनी तिच्या बॉयफ्रेंडसोबत परत आली. खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. रजनी म्हणाली की जर मंगलवर काही कारवाई झाली तर ती अनिलविरुद्ध खोटी तक्रार दाखल करेल. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.