मुंबई - बोगस कोरोना लसीकरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामध्ये कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, ठाणे आणि खारमध्येही बनावट लसीकरण शिबीर झाल्याचे उघडकीस आले असून सात ठिकाणी गुन्हे सुद्धा नोंदविण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत दहा आरोपींना अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे या बोगस लसीकरणात सहभाग असलेल्या चारकोपच्या शिवम हॉस्पिटलचे संस्थापक आणि डॉक्टरसह त्याच्या पत्नीस कांदिवली पोलिसांनीअटक केली आहे. शिवम हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. शिवराज पटारिया आणि निता पटारिया असं या दोघांचे नाव आहे.
३० एप्रिलनंतर खाजगी रुग्णालयांनी लस देणे बंद केल्यानंतर शिवम हॉस्पिटलने जुने कोव्हीशील्ड वॅक्सीन आणि रिकाम्या वाइल्स पालिकेला परत न करता आपल्याकडे ठेवले आणि त्या लसी व वाइल्स या बोगस लसीकरणासाठी वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे कोरोना लसीकरणाचे पहिले बोगस शिबीर ३० मे २०२१ रोजी कांदिवली पश्चिम येथे हिरानंदानी हेरिटेज क्लब हाऊसमध्ये आयोजित करण्यात आले होते. या सोसायटीतील ३९० नागरिकांना १ हजार २६० रूपये प्रति दराने लस देण्यात आली होती.
लसीकरण झाल्यानंतर सोसायटीच्या सदस्यांनी प्रमाणपत्राबाबत मागणी केली असता शिबीर आयोजकांनी लस घेतलेल्या नागरिकांना डाटा मागणी केला व त्याप्रमाणे सदस्यांना विविध रुग्णालय व कोविड सेंटर या संस्थेचे लस घेतल्याबाबत प्रमाणपत्र कोविन अँपवर देण्यात आले. मात्र, या प्रमाणापत्रात तफावत होती. याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी तपास केले असता लसीकरण बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या प्रकरणात डॉक्टर पती-पत्नीसह ८ आरोपींना केली अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ४० हजार रूपये जप्त आहे. आरोपीने इसमांनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लसी पुरविण्याकरिता गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.