राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे पैसे चोरल्याच्या संशयावरून पतीने पत्नीला काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी बेदम होती की यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पतीसह सासरच्या काही लोकांना अटक करण्यात आली आहे. काही लोक अजूनही फरार आहेत. मात्र याच दरम्यान, दोन्ही लहान मुलांची वाईट अवस्था झाली असून ते सतत रडत आहे. दोन्ही मुलं आई-वडिलांची आठवण करून रडत आहेत. ही संपूर्ण घटना केवळ संशयातून घडली आहे. पाली जिल्ह्यातील ट्रान्सपोर्ट नगर पोलीस स्टेशन हद्दीतील सुंदर नगर विस्तार कॉलनीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक विपिन कुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंदर नगर विस्तारमध्ये राहणारा गिरधारीलाल प्रजापत यांचा मुलगा दिलीप हा त्याची पत्नी जशोदा आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह राहतो. आरोपी दिलीप हा काही दिवसांपूर्वी बंगळुरूहून आपल्या भावासोबत पाली येथे आला होता. दोन्ही भाऊ सालासर बालाजी येथे गेले होते.
आरोपीचे वडील गिरधारी लाल यांनी खिशातून पैसे गायब झाल्याची तक्रार केली होती. तक्रारीनंतर आरोपीला पत्नीवर संशय आला. त्याने पत्नीची बंद खोलीत चौकशी केली, मात्र तिने उत्तरं न दिल्याने काठीने तिला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
आरोपी दिलीपने डॉक्टरांना सांगितलं की, त्याची पत्नी रस्ते अपघातात पडून जखमी झाली आहे. मात्र तपासाअंती ही हत्या असल्याचं निष्पन्न झालं. दिलीप आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या आईने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या मुलीचं 2016 मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दिलीप बंगळुरूला गेला होता. तो तिथेच काम करायचा. काही दिवसांपूर्वीच तो पालीला आला होता.