सोनीपत - हरियाणामधील सोनीपत येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका कुटुंबातील तीन सदस्यांनी कौटुंबिक कलहामुळे विषप्राषन करून आत्महत्या केली. आई-वडील आणि मुलगा अशा तिघांचा विषप्राषनानंतर रुग्णालयात उपचारांदरम्यान, मृत्यू झाला. सोनीपतमधील न्यू महावीर कॉलनी येथील रहिवासी दिनेश, त्यांची पत्नी बृजेश आणि मुलगा अंकित यांनी कौटुंबिक वादातून सल्फासच्या गोळ्या सेवन केल्या. त्यानंतर कॉलनीमध्ये आरडा-ओरडा सुरू झाला. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. तिथे उपचारांदरम्यान तिघांनीही एकापाठोपाठ एक करत प्राण सोडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासास सुरुवात झाली. (Wife complains of dowry harassment, husband and in-laws end life by poisoning)
पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोनीपतच्या न्यू महावीर कॉलनीमधील रहिवारी अंकित याचा दिल्लीतील डॉलीसोबत विवाह झाला होता. मात्र डॉलीने पती अंकित आणि सासू-सासऱ्यांविरोधात हुंड्याची मागणी केल्याची तक्रार दाखल केली. काल अंकितचे वडील दिनेश आणि आई बृजेश यांनी याप्रकरणात कोर्टामधून जामीन मिळवला. त्यानंतर आज तिघांनीही विषारी पदार्थाचे सेवन करून आपले जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. दरम्यान, मृत दिनेश यांचे भाऊ अनिल यांनी अंकितची पत्नी, तिचे वडील आणि काही नातेवाईकांवर आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई सुरू केली.
सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार यांनी सांगितले की, आम्हाला सोनिपतच्या सिव्हिल रुग्णालयामधून माहिती मिळाली की, न्यू महावीर कॉलनीमधील रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील ३ जणांनी विषप्राशन करून आत्महत्या केली आहे. मृतांमध्ये दिनेश, त्यांची पत्नी बृजेश आणि मुलगा अंकित यांचा समावेश आहे. मृतांच्या नातेवाईकांनी आरोप केला की, अंकितच्या पत्नीने त्यांच्याविरोधात हुंड्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. कालच त्यांना जामीन मिळाला होता. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तपासासाठी पोलिसांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. तसेच फरार आरोपींना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.