नवी मुंबई - उसन्या पैशावरून नातेवाईकाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून टाकल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी मयत व्यक्तीच्या पत्नीला देखील अटक केली आहे. घटनेवेळी मारेकरूकडून हत्येचा कट रचला जात असताना त्याच्या इशाऱ्यावरून पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर गेली होती. तर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर ती घरी आली असता दोन दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार केलेली.
एपीएमसी आवारात आढळलेल्या मृतदेहाच्या तुकड्यांवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. उसने घेतलेल्या पैशाची मागणी करूनही मिळत नसल्याने त्याने हत्या करून तीन ठिकाणी तुकडे टाकल्याची कबुली दिली आहे. मात्र पोलीसांच्या सखोल तपासात या घटनेला अधिक वेगळे वळण मिळाले आहे.
मयत व्यक्ती रवींद्र रमेश मंडोटिया (३०) याच्या हत्येची कल्पना त्याच्या पत्नीला होती, व तिच्या संमती नंतरच मारेकरूने रवींद्र याची त्याच्याच घरात हत्या केली. यामुळे पतीच्या हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असल्याने एपीएमसी पोलिसांनी तिला देखील अटक केली आहे. अटक आरोपी सुमितकुमार चौहान हा सतत रवींद्र याच्या घरी असायचा. घटनेच्या दिवशी सुमितकुमार हा रवींद्रच्या हत्येचा कट रचून त्याच्या घरी गेला होता. यावेळी सुमितकुमारच्या इशाऱ्यावरून रवींद्रची पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर गेली होती. त्यानंतर सुमितकुमार याने रवींद्रला दारू पाजल्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत असताना हत्या केली. यानंतर त्याच ठिकाणी त्याच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर घर स्वच्छ केले. तर रात्रीच्या वेळी मृतदेहाचे तिन्ही तुकडे घराबाहेर नेऊन वेगवेगळ्या ठिकाणी टाकले. या संपूर्ण घटनेची कल्पना त्याच्या पत्नीला असतानाही तिने मौन बाळगले. शिवाय दोन दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची तक्रार कोपर खैरणे पोलिसांकडे केली होती. मात्र सुमितकुमार याच्या अटकेनंतर त्याच्याकडून घटनाक्रम समजून घेत असताना पोलीसांना मृत रवींद्रच्या पत्नीवर देखील संशय आला. त्यानुसार शुक्रवारी तिला देखील अटक करण्यात आली आहे.