कानपूर पोलिसांनी एकता गुप्ता हत्या प्रकरणाचा खुलासा करताना आरोपी जिम ट्रेनर विमल सोनी याला अटक केली आहे. तसेच ४ महिन्यांनंतर एकताचे मृतदेहही सापडला आहे. मात्र एकताचा पती राहुल गुप्ता यांचा अजूनही पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, असं आवाहन राहुल यांनी मुख्यमंत्री योगी यांना केलं. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे.
राहुल गुप्ता यांनी 'आज तक'शी बोलताना पोलिसांच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पत्नीचं प्रेमप्रकरण होतं हा अँगल नाकारला आहे. ते म्हणाले की, एखाद्या महिलेचं पुरुषासोबत संभाषण होत असेल तर त्याला अफेअर म्हणता येणार नाही. पोलिसांनी योग्य तपास केला असता, तर त्यांनी हत्येचा हेतू वस्तुस्थितीसह मांडला असता.
राहुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सांगितलं की, विमलने स्वतः खड्डा खणून त्यात एकताचा मृतदेह पुरला पण एक माणूस तासाभरात पाच ते दहा फूट खड्डा कसा खणू शकतो या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलं नाही. अधिकारी वसाहतीतील कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही की तेथे कोणी मदत करणारे होतं असा सवालही केला आहे.
एकता आणि जिम ट्रेनर विमल यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं, त्यावर राहुलने त्यात काहीही तथ्य नसल्याचं सांगितलं. हे पूर्णपणे खोटं आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला आहे आणि आता तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जात आहे. स्वतःला वाचवण्यासाठी तिच्यावर आरोप केले जात आहेत. कारण, आता ती आपली बाजू मांडू शकत नाही.
राहुलच्या म्हणण्यानुसार, विमल त्याच्या पत्नीवर दबाव टाकत होता. अनेक दिवसांपासून तो हे हत्येचं प्लॅनिंग करत होता. कारण आधी प्लॅनिंग केल्याशिवाय अशी घटना घडू शकत नाही. जिम ट्रेनर विमलने प्रोटीन शेकमध्ये काहीतरी मिसळून ते एकताला दिल्याचा संशयही राहुलने व्यक्त केला आहे. विमल दोन वर्षांपासून जिम ट्रेनर होता, त्यामुळे साहजिकच तो एकताशी बोलायचा असंही सांगितलं.