देवगड : मिठबाव येथील प्रसाद लोके याचा चार दिवसांपूर्वीच मुणगे मशवी रस्त्यावर निर्घृणपणे खून झाला. त्यानंतर दोन दिवसांनी प्रसाद लोके याची पत्नी मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके (३०) हिने गुरुवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण पतीच्या मृत्यूच्या नैराश्येपोटी व तणावामुळे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे.
घटनेची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी रीतसर पंचनामा करून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मनवा ही मिठवाब येथील आपल्या घरी आईसोबत गुरुवारी रात्री झोपली होती. पहाटे तिच्या आईला जाग आली तेव्हा मनवा तिच्या बाजूला नसल्याचे लक्षात येताच तिने घरातील सर्वांना उठविले. घरात सर्वत्र शोधाशोध केली असता टेरेसवर शेडच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास लावलेल्या स्थितीत ती आढळून आली.
पतीच्या निर्घृण हत्येनंतर आता पत्नीनेही दोन दिवसांनी आत्महत्या केल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, प्रसाद याच्या खुनाचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. किशोर पवार याने फोन करण्यासाठी वापरले दुसऱ्याच्या नावावर रजिस्टर असलेले सिमकार्ड प्रसाद याचा खून करण्याच्या काही दिवस अगोदर किशोर याने जिओ कंपनीच्या मालवण येथील एका एजंटकडून नवीन सिमकार्ड घेतले होते. हे सिमकार्ड मालवण येथील एका मत्स्यव्यावसायिकाच्या बोटीवर कामाला असलेल्या खलाशाच्या नावावर रजिस्टर होते. या खलाशाने सिमकार्ड विक्रेत्या एजंटकडून काही सिमकार्ड खरेदी केली होती. यातील एक सिमकार्ड खलाशाने त्या एजंटला परत दिले होते.
मालवणमध्ये एकत्र शिक्षण घेतलेमालवण येथे एकत्र शिक्षण घेत असलेले प्रसाद लोके, किशोर पवार व पत्नी (मनवा उर्फ अंकिता प्रसाद लोके ) हे तिघेही परिचयाचे असल्याचे समजते. प्रसाद याचा खून संशयित किशोरने का केला, याचे ठोस कारण समोर आलेले नाही. कदाचित प्रसादच्या पत्नीला काही माहिती होती काय? याची चौकशी करण्याअगोदरच तिने आत्महत्या केल्यामुळे या प्रकरणातील महत्त्वाचा धागादोरा पोलिसांच्या हातून निसटल्याचे बोलले जात आहे.