राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर आता महिलेने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे 2022 रोजी रीमा नावाच्या या महिलेने प्रियकर भागेंद्र याच्यासोबत मिळून पतीची हत्या केली. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव पवन असं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्यांनी पवनचा मृतदेह पलंगावर ठेवला. त्यानंतर तिने स्वयंपाक घरात जाऊन पूरी, भाजी आणि खीर बनवली. भागेंद्रसोबत तिने जेवण केलं.
रात्री पवनचा मृतदेह कालव्यात फेकला. रीमाने सहा महिने पतीच्या हत्येची घटना लपवून ठेवली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून रीमाने 13 ऑक्टोबरला पवनसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला. संशयावरून पवनच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली तेव्हा ही बाब उघडकीस आली. 4 जून 2022 रोजी पवनचे वडील हरिप्रसाद यांनी चिकसाणा पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीस आणि कुटुंबीय पवनचा शोध घेत होते. मात्र, त्याचा कुठेही पत्ता लागला नाही.
16 ऑक्टोबरच्या रात्री सासरच्यांनी सुनेला प्रियकरासह रंगेहात पकडले. संशयाच्या आधारे सासरच्या मंडळींनी सून आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पवनची पत्नी रीमा आणि तिचा प्रियकर भागेंद्र यांना संशयाच्या आधारे अटक केली. चौकशीत रीमाने प्रियकरासह पतीची हत्या करून मृतदेह कालव्यात फेकल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला कालव्याजवळ नेले. त्यानंतर मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांना मृत पवनची पँट, आधारकार्ड आणि काही हाडं सापडली आहेत.
पोलिसांच्या चौकशीत रीमाने हत्येची संपूर्ण कहाणी सांगितली. ती कानपूरची रहिवासी आहे. 3 जून 2015 रोजी तिचे नौह गावातील पवनसोबत लग्न झाले. दोघांना लग्नानंतर एक मुलगा आणि मुलगी झाली. ज्यांचे वय 6 आणि 4 वर्षे आहे. पवन शर्मा गावातच दुकान चालवायचा. रीमाने सांगितले की, याचदरम्यान तिचे शेजारी राहणाऱ्या 27 वर्षीय भागेंद्र उर्फ भोला याच्यावर प्रेम जडलं. दोघांमध्ये लग्नबाह्य संबंध सुरूच होते. त्यानंतर 29 मेच्या रात्री ती प्रियकर भागेंद्रसोबत पळून जात असताना पवनने दोघांना रंगेहाथ पकडले. यानंतर तिने प्रियकरासह पतीची हत्या केली.
रीमाने पवनचा मृतदेह बेडवर ठेवला आणि किचनमध्ये जाऊन जेवणासाठी पुरी-भाजी आणि खीर केली. त्यानंतर भगेंद्रसोबत जेवण करून रात्रीच मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला. पतीची हत्या सर्वांपासून लपवून ठेवली. पवन आता या जगात नाही हे तिने आपल्या सासरच्यांनाही कळू दिले नाही. पवन बेपत्ता झाला असावा असे लोकांना वाटू लागले. त्यामुळे सासरच्यांनी 4 जून रोजी पवन बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. रीमाने सांगितले की, ती नेहमी मंगळसूत्र घालायची आणि भांगेत कुंकू भरायची, जेणेकरून लोक तिच्यावर कधीच संशय घेणार नाहीत. 13 ऑक्टोबरला तिने पवनसाठी करवा चौथचा उपवासही ठेवला होता. भरतपूरचे पोलीस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे.