नागपूर : प्रेमविवाह केल्यानंतर चार महिन्यातच पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला मंगळवारी जन्मठेप व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश दिनेश सुराणा यांनी हा निर्णय दिला. ही घटना पारडी पोलिसांच्या क्षेत्रातील आहे.
ललित सामेलाल मार्कंडे (२५) असे आरोपीचे नाव असून तो छत्तीसगड येथील मुळ रहिवासी आहे. घटनेच्या वेळी तो भंडारा रोडवरील मॉ उमिया एमआयडीसीमध्ये मजुरीचे काम करीत होता व तेथेच राहत होता. मृताचे नाव ज्योती होते. तिचा आरोपीसोबत १७ ऑक्टोबर २०२० रोजी प्रेमविवाह झाला होता. आरोपी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला मारहाण करीत होता. त्यामुळे नातेवाईकांनी ज्योतीला काही दिवस माहेरी सोडले होते. त्यानंतर तिला आरोपीकडे परत आणण्यात आले.
परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्री भांडण झाल्यानंतर आरोपीने ज्योतीची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. त्यांनी विविध पुराव्यांच्या आधारावर आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.