भाेपाळ : डाेक्यावरील कर्ज फेडण्यासाठी पतीने सुपारी देऊन पत्नीचा खून केल्याची घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. पत्नीच्या नावाने काढलेल्या ३५ लाख रुपयांच्या विम्याच्या रकमेसाठी पतीने हा कट रचला हाेता. मात्र, ती रक्कम मिळण्यापूर्वीच पाेलिसांनी त्याला अटक करून कट उधळून लावला.
राजगडमध्ये ही घटना घडली आहे. तेथील अतिरिक्त पाेलीस अधीक्षक मनकामना प्रसाद यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. भाेपाळ मार्गावरील कुरावर जाेड येथे २६ जुलै राेजी पूजा मीणा या महिलेची गाेळ्या घालून हत्या करण्यात आली हाेती. तपासामध्ये तिच्या हत्येचा कट पती बद्रीप्रसाद मीणा यानेच रचल्याचे उघडकीस आले आहे. प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बद्रीप्रसादवर ४० ते ५० लाख रुपयांचे कर्ज हाेते.
पूजाचा ३५ लाख रुपयांचा विमा काढला. ही रक्कम मिळवून कर्ज फेडण्याचा कट त्याने आखला. त्यासाठी त्याने गाेलू मीणा, शाकीर शाह आणि हुनरपाल सिंह यांना ५ लाख रुपये देऊन पत्नीच्या हत्येची सुपारी दिली. बद्रीप्रसादने विम्याची रक्कम लवकर कशी मिळविता येईल, यासाठी गुगल आणि यूट्यूबवर बरीच माहिती शाेधली हाेती. काेणत्या परिस्थितीत पैसे लवकर मिळतात, हे त्याला जाणून घ्यायचे हाेते. महत्त्वाचे म्हणजे, सुपारीचे पाच लाख रुपये बद्रीप्रसादने उधारीवर घेतले हाेते.