मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीनं तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे. पतीचा खून घडवून आणल्यानंतर पत्नीनं पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. जवळपास ११ महिने ती पोलिसांची दिशाभूल करत होती. पोलीस पतीला शोधण्यात हयगय करत असल्याचा आरोपही तिनं कोर्टात केला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून तिनं हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र अखेर तिचं भांडं फुटलं.
बेपत्ता झाल्यानंतर अनेक महिने उलटून गेल्यानंतरही महिलेच्या पतीचा शोध लागल्यानं न्यायालयानं पोलिसांची कानउघाडणी केली. अखेर ११ महिन्यांनंतर हत्येचा उलगडा झाला. महिलेच्या प्रियकरानं आणि त्याच्या मित्रानं पतीची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात उघड केली. हस्तीनापूरमधील चपरोलीत असलेल्या शेतातील विहिरीतून पतीचा सांगडा ताब्यात घेण्यात आला.
आरोपींनी विहिरीत मृतदेह फेकल्यानंतर त्यावर लाकडाच्या पट्ट्या टाकल्या. वर माती टाकून एक रोपटं लावलं. ११ महिन्यांत त्या रोपट्याचं झाड झालं आहे. पोलिसांनी मृताची पत्नी, तिच्या प्रियकराला अटक केली आहे. प्रियकराचा मित्र सध्या फरार आहे. पोलिसांची दिशाभूल कशी करायची आणि मृतेदहाची विल्हेवाट कशी लावायची यासाठी आरोपींनी क्राईम पेट्रोल मालिकेचा आधार घेतला.
मोहनगढचा रहिवासी असलेला फेरन सिंह जाटव ६ ऑगस्टला बेपत्ता झाला. त्याची पत्नी मालतीनं या प्रकरणी भितरवार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी पतीचा शोध न घेतल्याचा आरोप करत मालती न्यायालयात गेली. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला. मालतीचं चारित्र्य ठिक नसल्याचं पोलीस तपासात समोर आलं. कृपालपूरमध्ये वास्तव्यास असलेल्या रामअवतार जाटव सोबत तिचे जवळचे संबंध असल्याचं पोलिसांना समजलं.
मालतीची कठोर चौकशी केल्यावर ती लगेच न्यायालयात धाव घ्यायची. त्यामुळे पोलिसांनी तिच्या जागी रामअवतारची कसून चौकशी सुरू केली. सलग चार दिवस त्याची चौकशी चालली. दरम्यान त्यानं अनेकदा वेगवेगळे जबाब दिले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलीस खाक्या दाखवताच रामअवतारनं संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. मालती आणि मित्र शिवराज सोबत मिळून फेरनची हत्या केल्याची कबुली त्यानं दिली. शिवराज सध्या फरार आहे. रामअवतारला अटक झाल्याचं पाहताच मालतीनंदेखील गुन्ह्याची कबुली दिली.