चंदिगढ: हरयाणाच्या कर्नालमध्ये एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी तीन आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या हत्याकांडाचं रहस्य उलगडत नव्हतं. अखेर या प्रकरणाची उकल झाली आहे.
अमनदीप नावाच्या व्यक्तीचा खून त्याची पत्नी रविंद्र कौरनं घडवून आणली. प्रियकर सन्नीच्या मदतीनं तिनं पतीला संपवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र कौरचे अंबालातील सन्नीसोबत शाळेपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या लग्नानंतरही प्रेमसंबंध कायम राहिले. रविंद्र कौर उर्फ रिम्पीनं याची कल्पना पतीला लग्नानंतर दिली होती.
अमनदीपनं रिम्पीला सनीसोबत बोलण्याची मुभा दिली होती. यामुळे दोघांमधला संवाद वाढला. अमनदीप रिम्पीला फिरायला न्यायचा, त्यावेळी ती सनीलादेखील सोबत नेण्याचा हट्ट धरायची. काही दिवसांपूर्वी रिम्पी बहिणीच्या लग्नासाठी अंबालाला गेला होती. तर अमनदीप लग्नानंतर काही दिवसांनी कर्नालला परतला.
२४ नोव्हेंबरला सनीनं अमनदीपला अफिम घेऊन जाण्यासाठी बोलावलं. त्यावेळी सनीसोबत त्याचे मित्र कुणाल आणि मनी पेंटर हेदेखील होते. अफिम देण्याच्या बहाण्यानं त्यांनी अमनदीपला शेतात नेलं आणि हातोड्यानं वार करत त्याची हत्या केली. रिम्पी आणि सन्नी यांच्या नात्याच्या मध्ये येणारा अमनदीप बाजूला होण्यास नकार देईल या भीतीनं दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचला.