मीरा रोड : आधीच लग्न केले असताना दुसरे लग्न करून पतीला फसवणाऱ्या व त्याच्या घरातील रोख, दागिने चोरून पळालेल्या पत्नीसह तिचा पहिला पती व त्याच्या बहिणीविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाईंदरच्या जैन मंदिराजवळील राजूल इमारतीत विनोद माताप्रसाद मिश्रा (२७) राहतो. त्याची पाणीपुरीची टपरी असून २६ एप्रिल २०१८ रोजी त्याचे उत्तर प्रदेश येथे कल्पना फुलचंद तिवारीशी लग्न झाले. त्यानंतर, गावी गेलेली कल्पना परत आली असता तिच्यासोबत रोशनी संतोष तिवारी ही मुलगी होती. ती आपल्या मावशीची मुलगी असल्याचे तिने सांगितले. ६ सप्टेंबर रोजी पहाटे विनोदला जाग आली असता कल्पना ही रोशनी व मुलगा विकल्पसोबत घरातून निघून गेल्याचे तसेच जाताना तिने घरातील एक लाख रोख, सोन्याचा हार, मंगळसूत्र, बांगड्या, चेन, कानातले दागिने, अंगठ्या, चांदीचे दागिने घेऊन गेल्याचे उघड झाले. शोधाशोध करूनही तिचा शोध न लागल्याने २९ सप्टेंबर रोजी विनोदने कल्पनाची हरवल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी शोध घेतला असता ती विकल्पसह उत्तर प्रदेश येथे माहेरी आढळली. पोलिसांना तिने भाईंदरला घरी येण्यास नकार दिला. विनोदने चौकशी केली असता कल्पनाने त्याच्याशी लग्न करण्याआधीच संतोष तिवारीसोबत २३ एप्रिल २०१८ रोजी अलाहाबाद न्यायालयात लग्न केल्याचे उघड झाले. तसेच रोशनी ही कल्पनाच्या मावशीची मुलगी नसून संतोषची बहीण असल्याचे समजले.