लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लग्नानंतर नवऱ्याच्या घरचे दागदागिने लुटून वधू पसार झाल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी लग्न लावण्यासाठी पैसे घेणाऱ्या एजंटला अटक केली आहे तर पसार झालेल्या वधूचा शोध पोलिस घेत आहेत.पसार झालेल्या वधूचे नाव आशा गायकवाड (३०) असे असून तिचे पती म्हणजेच तक्रारदार ऋषभ मेहता (२८) हे आहेत. मेहता हे दमण निवासी असून, त्यांचे लग्न जुळत नव्हते त्यामुळे त्यांनी एका एजंटच्या मदतीने नवरी शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आशा हिच्याशी त्यांची भेट झाली आणि मेहतांचे तिच्याशी लग्न २९ मार्च २०२२ रोजी धूमधडाक्यात झाले होते. दरम्यान, १ एप्रिल रोजी गायकवाड ही मेहता यांच्या घरातील दीड लाखांची रोकड आणि ४ तोळे सोने घेऊन पसार झाली. ही बाब मेहता यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी याप्रकरणी मालाड पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार कमलेश कदम याला अटक करण्यात आली. त्याने लग्न लावण्यासाठी १५ हजार रुपये कमिशन घेतले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर लेंगरे, हवालदार गुजर, शिपाई गावडे, कोली, बोधले यांनी मिळून आरोपी नवरी व एजंटचा शोध सुरू केला. त्यानंतर एजंट कमलेशला मालाडमधून अटक करण्यात आली.
दागदागिने लुटून नवरी झाली पसार, एजंटला मालाड पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 10:30 AM