मुंबई: एका बड्या अधिकाऱ्याची हत्या करून ती आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न त्याच्याच पत्नी आणि मुलानं केला आहे. अधिकाऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह सातव्या मजल्यावरून फेकण्यात आला. अधिकाऱ्यानं याआधी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचाच संदर्भ देऊन मायलेकांना खून पचवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी संपूर्ण बनाव रचन दोघांना बेड्या ठोकल्या.
अंधेरी पश्चिमेतील सिडबी क्वाटर्समध्ये वास्तव्यास असलेल्या संतानक्रिष्णन शेशाद्री (५४) यांची हत्या त्यांच्याच पत्नी आणि मुलानं केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेशाद्री एका कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी जयशीला (२२) आणि मुलगा अरविंद (२६) यांना अटक केली आहे. पाच तास चौकशी केल्यानंतर दोघांनी हत्येची कबुली दिली.
शेशाद्री यांची हत्या करण्यासाठी माय लेक पहाटे ४ चा अलार्म लावून उठले. त्यांनी शेशाद्री यांचं डोक बेडवर आपटलं. डाव्या हाताची नस कापली. तासाभरानंतर दोघांनी त्यांचा मृतदेह बाल्कनीतून खाली फेकला. 'शेशाद्री दोघांची काळजी घेत नव्हते. त्यामुळे त्या दोघांनी शेशाद्री यांचा खून करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोघांचा शेशाद्री यांच्याशी वाद झाला होता,' अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
शेशाद्री यांची हत्या करण्याची संधी त्यांना दुसऱ्याच दिवशी मिळाली. शेजारी घरी नसल्याचं पाहून दोघांनी शेशाद्री यांना संपवण्याचं ठरवलं. पोलिसांना घरात रक्ताचे डाग असलेले कपडे वॉशिंग मशीनमध्ये आढळून आले. माय लेकानं पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांना आढळून आलं. घराची झडती घेत असताना पोलिसांना आढळून आलेल्या काही वस्तूंमुळे आणि दोघांच्या जबाबातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय वाढला.
'आम्हाला बेडरुममध्ये रक्ताचे डाग आढळून आले. मात्र त्याकडे दोघांनी दुर्लक्ष केलं. आम्हाला आत्महत्येची माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडून समजल्याची बतावणी त्यांनी केली. शेशाद्री यांनी २०११ मध्ये सिकंदराबादमध्येही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तशी नोंद तिथल्या पोलिसांकडे आहे,' असंही दोघांनी पोलिसांना सांगितलं. शेशाद्री यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांशी संपर्क केला असता, त्यांनी शेशाद्रींचं वर्तन सामान्य असल्याचं सांगितलं.
'कुटुंबाच्या खर्चातील वाटा शेशाद्री देत नव्हते. अरविंद बीटेक असूनही त्याला नोकरी नव्हती. नोकरीसाठी त्याला न्यूझीलंडला जायचं होतं. त्यासाठीचा खर्च वडिलांनी करावा, असा तगादा त्यानं लावला होता. मात्र शेशाद्री तयार नव्हते. शेशाद्री बेडरुममध्ये झोपायचे. मुलगा आणि पत्नीला तिथे जाण्याची परवानगी नव्हती. त्यांना हॉलमध्येच झोपावं लागायचं. शेशाद्री काळजी घेत नसल्यानं दोघांनी त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला', अशी माहिती पोलिसांनी दिली.