कल्याण : वडिलोपार्जित मालमत्ता नावावर करण्यासाठी सुरेश पावशे याला मारहाण करत घरातील मंडळींनीच १० दिवस घरात डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पावशे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांची पत्नी दूर्वा, मुलगा निखिल, पुतण्या स्वप्निल आणि भाचा पुष्कर सुतार अशा चौघांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.कल्याण पूर्वेतील हनुमाननगर परिसरात हा प्रकार घडला आहे. पावशे हे रिक्षाचालक आहेत. त्यांच्या नावावर काही वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ही मालमत्ता आमच्या नावावर करा, अशी मागणी पत्नी आणि मुलगा अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे करत होते. त्यावर पावशे त्यांची वारंवार समजूत काढत त्यांची मागणी टाळत होते. अखेर दूर्वा, निखिल, स्वप्निल आणि पुष्कर यांनी त्यांना मारहाण करत घरातील एका खोलीत दहा दिवस डांबून ठेवले. मात्र, तेथून कशीबशी त्यांनी त्यांची सुटका करून घेत थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले.
निखिलची पोलीस कोठडी वाढवलीपोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत दूर्वा, निखिल, पुतण्या स्वप्निल, पुष्कर या चौघांना अटक केली. सर्व आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, सोमवारी कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले गेले. यात मुलगा निखिल याची पोलीस कोठडी एक दिवसाने वाढविण्यात आली, तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली.