लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील कोलारा येथे १९ मेच्या सकाळी उघडकीस आली आहे. पार्वती निवृत्ती सोळंकी (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.निवृत्ती बाळाजी सोळंकीहा नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करायचा. १८ मे रोजी गावातील नानमुखाचा कार्यक्रम असल्यामुळे पार्वती सोळंकी तिथे आपल्या मुला समवेत स्वयंपाकासाठी गेल्या होत्या. सायंकाळी त्या जेवण करून परत आल्या होत्या. निवृत्तीही तेथूनच जेवण करून आला होता. मात्र रात्री त्याने नानमुखाच्या कार्यक्रमाला मला न विचारता का गेली, अशी विचारणा सुरू केली. सोबतच पत्नीस वायरने मारहाण केली. लहान मुलाने मध्यस्थी करून भांडण सोडविले. मात्र निवृत्तीने भांडण सुरच ठेवल्याने रात्री गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किसन सोळंकी यांनी नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांना समजावून सांगत वाद मिटवला. मोठा मुलगा रामेश्वर हा काही महिन्यापासून आतेबहिणीकडे गेलेला असल्याने सासू सुभद्रा या आपल्या लेकीकडे गेलेल्या असल्याने घरात पती-पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघेच जण होते. दरम्यान रात्री मुलगा झोपी गेल्यानंतर निवृत्तीने पत्नीचा वायरच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. सकाळी आई उठत नसल्याचे पाहून मुलाने शेजारच्यांना बोलावून आणेले तेव्हा पार्वती मृत्यू पावल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळालनंतर पोलिसांनी लगोलग घटनास्थळ गाठून पंचनामा करत आरोपी निवृत्ती सोळंकी यास अटक केली. विठोबा साहेबराव परीहार (भालगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निवृत्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास चिखली पोलिस करत आहे.यापूर्वीही पोलिसांत दाखल झाली होती तक्रार या प्रकरणातील मृत महिलेचा पती निवृत्ती सोळंकी यास दारूचे व्यसन आहे. तसेच तो चारित्र्याच्या संशयावरून नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. गत ५ फेब्रुवारी २०२० रोजी देखील त्याने मारहाण, शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मृत महिलेच्या भावाने पोलीसांत तक्रार दाखल करून बहीणीला माहेरी नेले होते. मात्र, त्यावेळी पुन्हा त्रास देणार नाही असे सांगून आरोपीने घरी परत नेले होते. मृत महिलेला दोन मुले व एक १९ वर्षांची मुलगी आहे.
पत्नीची गळा आवळून हत्या ; आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 9:45 AM