नाशिक : वडाळागावातील तैबानगर परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये झालेल्या वादातून पतीने मोबाइल चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून तिला ठार मारल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर, आरोपी रिजवान पठाण हा सोमवारी (दि.१५) स्वत:हून इंदिरानगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने पत्नीच्या खूनाची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी त्यास अटक करत घटनास्थळ गाठले.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळागावात राहणारा संशयित रिजवान इसाक पठाण (३४) याने त्याची पत्नी हुमेरा उर्फ मीनाज पठाण (२९) हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत तिचा शारिरिक-मानसिक छळ सुरु केला होता. तीन महिन्यांपूर्वी पिडित विवाहितेला त्याने घरातून हाकलून लावले होते. यावेळी त्याच्याविरूद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात हुमेरा हिने तक्रार अर्जही दिला होता. त्यानंतर हुमेरा माहेरी होती परंतु पती-पत्नीमध्ये समझोता झाल्याने ती पुन्हा रिजवान याच्या वडाळागावातील तैबानगरमधील बाग-ए-तबस्सुम या अपार्टमेंटच्या १८ क्रमांच्या सदनिकेत नांदायला आली होती. सोमवारी (दि.१५) पहाटे सहा वाजताच्या सुमारास संशयित रिजवानने त्याची पत्नी हुमेरा हिचा बेडरूममध्ये चार्जरच्या वायरने गळा आवळून ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी (दि१५) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हुमेराची सासू हुसनाबी यांनी फिर्यादी मयत विवाहितेचा भाऊ गुलामगौस शकील शेख यास फोनवरून याबाबत माहिती कळविली. यानंतर गुलामगौस व त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्याची बहीण हुमेरा हिचा वायरने गळा आवळल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे, पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांनी पथकासह धाव घेतली. यावेळी पिडित विवाहिता हुमेरा हिचा गळा आवळून खून केल्याचे लक्षात आले. पंचनामा करून पोलिसांनी विवाहितेचा मृतदेह जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविला. मयत हुमेराच्या पश्चात आई, आठ वर्षांचा मुलगा, सहा वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा आई, वडील, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.