बिजनौर- उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील सौरभ हत्याकांडासारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. बिजनौर जिल्ह्यातील एका पतीचा पत्नीने खून केल्याचं उघड झाले. हत्येनंतर पत्नीनं पतीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाल्याचा बनाव रचला परंतु पोस्टमोर्टम रिपोर्ट येताच सत्य बाहेर पडले. पतीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला नाही असं रिपोर्टमध्ये होत. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा आरोपी पत्नीने तिचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. यात आणखी कुणाचा सहभाग होते का याचा पोलीस शोध घेत आहेत.
बिजनौरच्या नजीबाबाद येथील ही घटना आहे. आदर्श नगर येथे पत्नी आणि १ वर्षाच्या मुलासह दीपक कुमार एका भाड्याच्या खोलीत राहत होते. ४ एप्रिलला दीपकचा घरात संशयास्पद रित्या मृत्यू झाला. हार्ट अटॅकनं हा मृत्यू झाल्याचा दावा करत पत्नी डॉक्टरांकडे पोहचली. मात्र जेव्हा दीपकच्या मृतदेहाचे पोस्टमोर्टम केले तेव्हा सगळेच हैराण झाले. नोकरी आणि फंडासाठी भावाची हत्या केल्याचा आरोप दीपकच्या भावाने वहिनीवर केला.
वर्षभरापूर्वी झाला होता प्रेमविवाह
दीपक कुमारचं शिवानीसोबत १७ जानेवारी २०२४ रोजी प्रेमविवाह झाला होता. त्यानतंर दीपक पत्नीसह नजीबाबादच्या आदर्श नगर येथे भाड्याने राहू लागला. शुक्रवारी दुपारी शिवानीने पती दीपकला हार्टअटॅक आल्याची माहिती सासू आणि दीराला दिली. पतीला खासगी हॉस्पिटल आणि तिथून सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणले गेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना भरती केले नाही. बिजनौर जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये दीपकला मृत घोषित करण्यात आले. पतीचे पोस्टमोर्टम होऊ नये असं पत्नी शिवानी म्हणत होती परंतु कुटुंबाने दीपकच्या गळ्याभोवती खूणा पाहून पोस्टमोर्टम केले.
पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये दीपकचा मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे तर गळा दाबून झाल्याचं उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पत्नी शिवानीला पकडून खाकीचा धाक दाखवताच तिने हत्येची कबुली दिली. दीपकची बायको शिवानी सासूला मारहाण करायची. घरात सातत्याने वाद सुरू होते. १५ दिवसांपूर्वीच दीपकने पत्नीला नजीबाबादला नेले. पोलिसांच्या माहितीनुसार, एका रस्सीने दीपकचा गळा दाबला आहे. ज्यावेळी घटना घडली तेव्हा तो काहीतरी खात होता. पोस्टमोर्टममध्ये त्याच्या गळ्यात खाद्य पदार्थ अडकल्याचे दिसून आले.
दरम्यान, दीपक २०२१ साली सीआरपीएफ मणिपूरमध्ये भरती झाला होता. त्यानंतर सीआरपीएफची नोकरी सोडून त्याने २०२३ साली रेल्वेत नोकरी मिळवली. त्याची पोस्टिंग नजीबाबादला झाले होते. दीपकनं शिवानीसोबत लव्ह मॅरेज केले होते. शिवानीच्या घरच्यांना दीपक आवडत नव्हता. पत्नीच्या हट्टापायीच दीपकने भाड्याने खोली घेतली. या प्रकरणात अन्य कुणी सहभागी आहे का हादेखील शोध घेतला जात आहे.