राजस्थानच्या बा़डमेरमध्ये एका महिलेने पोलिसांत पतीविरोधात तक्रार केली आहे. तसेच त्याचा व्हिसा नुतनीकरण करू नये, तो रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. गेल्या काही वर्षांपासून तिचा पती रशियात राहतो. दरवेळी आला की तिला तुला पुढच्या वेळी नक्की रशियाला घेऊन जाईन, असे आश्वासन देत निघून जात होता. महिलेला १० वर्षांचा मुलगा आहे. असे सतत आठ वर्षे सुरु होते. आता पतीची पोलखोल झाली आहे.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या महिलेचे नाव दीपिका आहे. तिचे २००९मध्ये जोधपूरच्या भगवान दास याच्याशी लग्न झाले होते. २०१४ पर्यंत सारेकाही ठीक सुरु होते. त्यानंतर भगवानला रशियामध्ये नोकरी मिळाली. तो मॉस्कोला निघून गेला. तेव्हापासून दीपिका आणि सासरच्यांमध्ये वाद सुरु झाले. तिला त्रास देऊ लागले. पती दर दोन वर्षांनी घरी येत होता. तेव्हा प्रत्येकवेळी पुढच्या वेळी आलो की तुला रशियाला घेऊन जाईन असे आश्वासन द्यायचा.
२०२० मध्ये कोरोनातून सूट मिळाल्यामुळे भगवान पुन्हा घरी आला. तेव्हा दीपिका आणि त्याच्यात वाद झाला. आठ वर्षे झुलवत ठेवल्याने वैतागलेल्या दीपिकाने यावेळी रशियाला घेऊनच चल, असा दबाव टाकला. तेव्हा त्याने मी दुसरे लग्न केल्याचे तिला सांगितले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. दीपिका माहेरी निघून आली. समाजाने पंचायत बसविली परंतू त्यात काही तोडगा निघाला नाही. आता दीपिकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर पोलीस अधीक्षक दीपक भार्गव यांनी सांगितले की, दीपिकाने तक्रार दिली असून, त्यावरून महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बाब रशियाशी संबंधित आहे, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आम्ही पासपोर्ट नूतनीकरण थांबवण्याचा प्रयत्न करू. तसेच, दीपक भारतात येताच त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जातील.