छत्तीसगडमधील बलौदा बाजार भागात काळीज पिळवटून टाकणारी ही घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या भाटापारा येथील सिद्धबाबा येथील साई मंदिराच्या पुजारीने आपल्या पत्नीला जिवंत जाळले. काल रात्री 9 ते 10 च्या दरम्यान ही घटना घडल्याचं सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारी रामायण पांडे (३५) याने पत्नी मंदाकणी पांडे (२५) यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होती. या कारणास्तव त्याने प्रथम आपल्या पत्नीला धारदार शस्त्राने जखमी केले, नंतर गॅसच्या शेगडीच्या आगीने तिला जिवंत पेटवून दिले.पोलीस ठाण्याचे प्रभारी भाथपारा रोशनसिंह राजपूत यांनी सांगितले की, पुजारी रामायण पांडे याने पत्नीला मंदिराच्या आवारातील खोलीत बंद केले आणि तिला गॅस शेगडीच्या आगीने पेटवून दिले. तो सकाळपासून पत्नीला मारहाण करत होता आणि तिला धारदार शस्त्राने जखमी केले होते.
घटनेच्या दिवशी सकाळपासूनच रामनारायण आणि मंदाकिनी यांच्यात वाद होत होते. त्यानंतर या पुजाऱ्याने पत्नीला बेदम मारहाण केली. दुपारपर्यंत तो पत्नीला मारहाण करत होता. त्यानंतर काही कामासाठी तो बाहेर गेला. रात्री नऊ वाजता तो परत घरी आला. घरी आल्यावर त्याने पुन्हा पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. हातात येईल ती गोष्ट घेऊन तो पत्नीवर सपासप वार करत राहिला. यामुळे अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या पत्नीच्या अंगावर त्याने पेटलेली गॅस शेगडी ठेवली. त्यामुळे तिच्या कपड्यांनी आणि अंथरुणाने पेट घेतला. घरात त्यावेळी मेहुणा, मेहुणी आणि लहान मुलं होती. त्यांनी पुजाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणी मध्यस्थी केली तर त्याला जीवे मारण्याची धमकी त्याने दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुजारी रामायणविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.