बंगळुरू : काैटुंबीक न्यायालयात लग्न वाचविण्यासाठी पती आणि पत्नीचे समुपदेशन करण्यात आले. त्यांनी मतभेद संपवून एकत्र राहण्याची तयारीही दर्शविली. मात्र, काेर्टरूममधून बाहेर पडल्यानंतर पतीने पत्नीचा निर्दयीपणे गळा चिरून हत्या केली. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात हाेलेनरसीपुरा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे.हसन जिल्ह्यातील थट्टेकेरे गावातील चैत्रा हिचा शिवकुमारसाेबत ७ वर्षांपूर्वी विवाह झाला हाेता. त्यांना एक मूलदेखील आहे. मात्र, काही वर्षांमध्ये पती - पत्नीचे नाते बिघडले. त्यामुळे त्यांनी घटस्फाेटासाठी अर्ज दाखल केला हाेता. न्यायालयाने दाेघांना समुपदेशन करण्यासाठी शनिवारी सकाळी बाेलावले हाेते. दाेघांचे जवळपास एक तास समुपदेशन झाले. त्यानंतर दाेघांनीही मतभेद विसरून लग्न टिकविण्याची तयारी दर्शविली. मात्र, शिवकुमारने चैत्रावर कुऱ्हाडीने हल्ला केला. (वृत्तसंस्था)
न्यायालयात कुऱ्हाड कशी मिळाली?शिवकुमारने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाेकांनी त्याला पकडून पाेलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयात त्याला कुऱ्हाड कशी मिळाली तसेच हा पूर्वनियाेजित खून हाेता का, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.