जळगाव : सतत मारहाण होत असल्याने सासरी जाण्यास नकार देणाऱ्या नयन भूषण साळुंखे (२०) या विवाहितेला पतीने मारहाण करण्यासह सासू-सासऱ्यांनी दमदाटी केल्यानंतर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १० सप्टेंबर रोजी दुपारी घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील भोकर येथील माहेर असलेल्या नयन साळुंखे यांचा विवाह यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील भूषण सुभाष साळुंखे यांच्याशी झाला. सासरी वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याने सदर विवाहिता माहेरी निघून आली. त्यानंतर ९ सप्टेंबर रोजी तिचे पती, सासू-सासरे हे भोकर येथे विवाहितेच्या माहेरी आले. त्यावेळी त्यांनी तुमची मुलगी घरात चांगली वागत नाही, किरकोळ कारणावरून वाद घालते असे विवाहितेच्या वडिलांना सांगितले. त्यावेळी विवाहितेने सांगितले की, सासरी मला कोणत्या न कोणत्या कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण करतात. त्यामुळे मला सासरी जायचे नसल्याचे तिने सांगितले. त्याचा राग आल्याने पतीने विवाहितेला मारहाण केली, तसेच सासू-सासऱ्यांनी दमदाटी केली.
त्यानंतर विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद विवाहितेचे वडील ज्ञानेश्वर सीताराम सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पती भूषण सुभाष साळुंखे, सासरे सुभाष नामदेव साळुंखे, सासू रेखाबाई सुभाष साळुंखे, सर्व रा. कोळन्हावी, ता. यावल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि नयन पाटील करीत आहेत.