कल्याण - पुलवामा हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट पसरली असताना कल्याणमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका दहशतवादी संघटनेचं नाव वायफाय कनेक्शनला देण्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका सोसायटीतील घरातील वैयक्तिक वायफायला दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तालिबान’चं नाव दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. काही वर्षांपूर्वी कल्याणमधील युवक आयसिसच्या प्रशिक्षणासाठी देखील मोठी चर्चा झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन कॉम्प्लेक्स येथे हा प्रकार घडला आहे. काॅम्प्लेक्समधील काही रहिवाशांनी वायफाय सर्च केले असते त्यांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर रहिवाशांकडून तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. याबाबत माहीती मिळताच तात्कळ पोलीस घटनास्थळी हजर झाले. वायफायचं नेटवर्क ट्रेस करुन संबंधित 20 वर्षांच्या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले. शिवाय यानंतर त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. परंतु केवळ गंमतीचा भाग म्हणून फोनचं नाव ‘लष्कर ए तालिबान’ ठेवल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. त्याचं उत्तर ऐकून पोलिसांनी त्याची योग्यरित्या कानउघाडणी केली आणि पोलिसांनी तरुणाला समज देऊन सोडलं.