मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने पुन्हा एकदा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण पुढे करत हा जामीन अर्ज इंद्राणीने दाखल केला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाकडे तिने हा अर्ज केला आहे. तुरुंगवासात माझा मृत्यू झाला तर सीबीआय जबाबदारी घेईल का? असा प्रश्न देखील तिने आपल्या अर्जात विचारत जामीन मिळावा म्हणून विनंती केली आहे.
इंद्राणी मुखर्जीने याआधीही प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जामिनासाठी अर्ज केला होता तो कोर्टाकडून फेटाळण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा तिने अर्ज केला आहे. २४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची हत्या झाली होती. हे हत्याकांड २०१५ मध्ये उघडकीस आले. इंद्राणीचा ड्रायव्हर शामवर राय याला आर्म्स अॅक्टअंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने या हायप्रोफाईल हत्येचा पर्दाफाश केला. इंद्राणी मुखर्जीने तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून शीना बोराची हत्या केली. २०१५ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यावर याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी, संजीव खन्ना, शामवर राय या सगळ्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. दरम्यान सप्टेंबर महिन्यातच इंद्राणी मुखर्जीने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता जो फेटाळण्यात आला. आता पुन्हा एकदा इंद्राणीने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला आहे.