मुंबई : चित्रपट निर्माते संदीप सिंह यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी संदीप सिंह यांनी आंबोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याची जशी हत्या केली तशी तुझी हत्या केली जाईल, अशी धमकी संदीप सिंह यांना देण्यात आली होती. संदीप सिंह यांना सोमवारी ४ जुलै रोजी ही धमकी फेसबुकवरून मिळाली होती.
संदीप सिंग अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड येथे राहत असून धमकी मिळाल्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आंबोली पोलिसांनी बुधवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला असून सायबर टीम संशयिताचा मेसेजच्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. संशयित राजपूत याने फेसबुक मेसेंजरवर संदीप यांना धमकीचा संदेश पाठवला. यात लिहिलं होतं : 'चिंता मत करना, जिस तरह मूसेवाला को गोली मारी गई है, उस तरह तुझे भी मारा जायेगा, प्रतीक्षा कर और याद राख'," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं .
'भूमी', 'सरबजीत', 'झुंड' आणि 'पीएम नरेंद्र मोदी' सारखे सिनेमे बनवणारा अंधेरी (पश्चिम) येथील संदीप सिंह हा सुशांतसिंग राजपूतचा मित्र होता. जून 2020 मध्ये अभिनेत्याच्या निधनानंतर संदीप सिंह चर्चेत होते. त्यांचा पुढचा येऊ घातलेला चित्रपट विनायक दामोदर सावरकर हा स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजल्यानंतर अंबोली पोलिसांनी त्या अनुषंगाने आरोपाचा शोध घेण्यास सुरुवात केली. शिवाय, गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. लिजेंड स्टुडिओची स्थापना 2015 मध्ये संदीप सिंग यांनी केली होती, जो मेरी कोम, अलीगढ, सरबजीत, भूमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झुंड या मोशन पिक्चर्सच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे.